INDvsENG : डे नाईट सामन्यापूर्वी आशिष नेहराने पाहुण्या संघाला दिला अमूल्य सल्ला 

INDvsENG : डे नाईट सामन्यापूर्वी आशिष नेहराने पाहुण्या संघाला दिला अमूल्य सल्ला 
INDvsENG

भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. आणि यातील दोन सामने चेन्नईत पार पडले आहेत. तर उर्वरित दोन सामने अहमदाबादच्या नवीन सरदार वल्लभभाई पटेल (मोटेरा) आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. शिवाय उर्वरीत दोन सामन्यांपैकी पहिला सामना हा डे नाईट खेळवण्यात येणार आहे. यावर भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने इंग्लंडच्या संघाला सल्ला दिला आहे. गुलाबी चेंडूने खेळल्या जाणाऱ्या या सामन्यासाठी आशिष नेहराने इंग्लंडच्या संघाला जोफ्रा आर्चर, जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्यासह मैदानात उतरण्याची शिफारस केली आहे. 

अहमदाबाद येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात डे नाईट सामना येत्या बुधवार पासून खेळवण्यात येणार आहे. आणि या सामन्यात इंग्लंडचा संघ जोफ्रा आर्चर, जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्यासह मैदानात उतरल्यास जो रुटच्या नेतृत्वाखालील संघाला फायदा होणार असल्याचे मत आशिष नेहराने व्यक्त केले आहे. जोफ्रा आर्चर व जेम्स अँडरसन चेन्नईत झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात मैदानावर उतरले होते. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात त्यांना विश्रांती देण्यात आली होती. आणि स्टुअर्ट ब्रॉडला पहिल्या सामन्यात न खेळवता दुसऱ्या सामन्यात मैदानात उतरवण्याचा निर्णय इंग्लंडच्या संघाने घेतला होता. परंतु त्याला या सामन्यात नावाला साजेशी खेळी करता आली नव्हती. यावर माजी गोलंदाज आशिष नेहराने एका मुलाखतीत बोलताना, या तिन्ही गोलंदाजांना जो रूटने आगामी डे नाईट सामन्यात मैदानात उतरवणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. 

आशिष नेहराने वेगवान गोलंदाजांचा विचार केल्यास इंग्लंडच्या संघाकडे गोलंदाजांची कमी नसल्याचे मुलाखतीत सांगितले. तसेच दुसर्‍या कसोटी सामन्यात इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड आपल्या सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला नाही. व तो पहिल्या कसोटीत देखील मैदानावर उतरला नव्हता. तर दुसऱ्या कसोटी सामन्याच्या उत्तराधार्त स्टुअर्ट ब्रॉड पुन्हा फॉर्म मध्ये परतत असल्याचे पाहायला मिळाल्याचे आशिष नेहरा सांगितले. मात्र त्यावेळी खूप उशिराने त्याच्याकडे गोलंदाजी सोपविण्यात आल्याचे आशिष नेहराने नमूद केले. 

याव्यतिरिक्त, इंग्लंडच्या संघातील जोफ्रा आर्चर हा सर्वात प्रतिभाशाली खेळाडू असल्याचे आशिष नेहराने सांगितले. आणि मागील 2 ते 3 वर्षांमध्ये आपण पाहिलेल्या सर्व युवा प्रतिभावान गोलंदाजांपैकी जोफ्रा आर्चर हा एक गोलंदाज असल्याचे आशिष नेहरा म्हणाला. आणि तो तंदरुस्त व पूर्ण फॉर्म मध्ये असल्यास इंग्लंडच्या संघाला मोठा फायदा होणार असल्याचे आशिष नेहराने म्हटले आहे. यानंतर जेम्स अँडरसन मध्ये देखील खूप प्रतिभा असल्याचे आशिष नेहराने पुढे सांगितले. व या तिघांनाही आगामी सामन्यात मैदानात उतरवल्यास इंग्लंडच्या संघाला मोठा फायदा होण्याची शक्यता असल्याचे आशिष नेहराने सांगितले. 

तसेच, स्टुअर्ट ब्रॉडने लेग कटर आणि विकेट टू विकेट गोलंदाजी केल्यास त्याला आगामी सामन्यात यश मिळू शकते असे आशिष नेहराने सांगितले. तर जोफ्रा आर्चरने वेगवान आणि बाऊन्सर गोलंदाजी केल्यास व जेम्स अँडरसन स्विंग आणि रिव्हर्स स्विंगचा वापर केल्यास इंग्लंडच्या संघासाठी मोठे अस्त्र सिद्ध होणार असल्याचे आशिष नेहरा म्हणाला. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी हा सामना महत्वाचा ठरणार असल्याचे आशिष नेहराने या मुलाखतीत अधोरेखित केले.                   

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com