पश्चिम बंगाल विधानसभेत आमदार म्हणून अशोक दिंडाचं पदार्पण

दैनिक गोमंतक
बुधवार, 5 मे 2021

राजकारणात प्रवेश केल्यानंतर आता त्याने पश्चिम बंगाल विधानसभेत आमदार बनून पदार्पण केले आहे.

पणजी : भारताचा माजी आंतरराष्ट्रीय वेगवान गोलंदाज अशोक दिंडा क्रिकेट कारकिर्दीत गोव्याकडून पाहुणा क्रिकेटपटू या नात्याने शेवटचा सामना खेळला, राजकारणात प्रवेश केल्यानंतर आता त्याने पश्चिम बंगाल विधानसभेत आमदार बनून पदार्पण केले आहे.

दिंडाने यावर्षी जानेवारीत इंदूरमध्ये झालेल्या सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेत त्याने गोव्यातर्फे देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. मात्र तंदुरुस्तीने दगा दिला. तीन सामन्यात 12 षटके गोलंदाजी केल्यानंतर दिंडा गोव्याकडून बाकी दोन्ही सामने खेळण्यास असमर्थ ठरला. त्यानंतर विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा तोंडावर असताना त्याने फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली, त्याच्या या अचानक निर्णयामुळे गोवा क्रिकेट असोसिएशनलाही धक्का बसला होता. ( Ashok Dindas debut as MLA in West Bengal Legislative Assembly)

बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय; आयपीएलचे पुढील सामने रद्द

क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर दिंडाने राजकीय वाट चोखाळली. त्याने भारतीय जनता पार्टीत (भाजपा) प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्याने मोयना विधानसभा जागेसाठी उमेदवारी दिली. राजकारणात नवखा असूनही दिंडाने या ठिकाणच्या मावळत्या आमदारास हरवून पश्चिम बंगालच्या राजकारणात नवी इनिंग सुरू केली. दिंडाने तृणमूल काँग्रेसच्या संग्रामकुमार दोलाई यांचा 1260 मतफरकाने पराभव केला.

रणजी करंडक क्रिकेटमध्ये 37 वर्षीय दिंडा डिसेंबर 2019 मध्ये शेवटच्या वेळेस बंगालकडून खेळला होता, तेव्हा बंगाल संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक रणदेब बोस यांच्याशी वाद झाल्यानंतर, माफी मागण्यास नकार दिल्याने दिंडास संघातून वगळण्यात आले होते. दिंडाने भारताचे 13 एकदिवसीय व नऊ टी-20 सामन्यांत प्रतिनिधित्व करताना अनुक्रमे 12 व 17 विकेट्स प्राप्त केल्या आहेत. 116 प्रथम श्रेणी सामन्यांत त्याने 420 विकेट टिपल्या आहेत.

IPL 2021: ''हे '' 5 विक्रम यंदाच्या आयपीएल हंगामात मोडू...

दिंडाचा बंगाल संघातील सहकारी 35 वर्षीय माजी आंतरराष्ट्रीय फलंदाज मनोज तिवारी याने सुद्धा पश्चिम बंगालमधील निवडणुकीत बाजी मारली असून तो तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर शिबपूर मतदारसंघातून विजयी झाला. मात्र फुटबॉल गोलरक्षक कल्याण चौबे याला दिंडा, तिवारी यांच्याप्रमाणे निवडणुकीत यश मिळाले नाही. गोव्यातील साळगावकर क्लबचा हा माजी गोलरक्षक भाजपाच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात होता, मणिकताला मतदारसंघात तो तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराविरुद्ध पराभूत झाला.

गोव्यातर्फे टी-20 स्पर्धेत अशोक दिंडा

- 3 सामने, 3 डाव

- 12 षटके, 121 धावांत 5 विकेट

- 10.08 इकॉनॉमी, 24.20 सरासरी
 

संबंधित बातम्या