टीम इंडियाच्या फिरकीपटूने ऑस्ट्रेलियात घडलेल्या घटनेसंदर्भात केला मोठा खुलासा 

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 25 जानेवारी 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात आलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत मालिका आपल्या खिशात घातली.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात आलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत मालिका आपल्या खिशात घातली. ऍडिलेड येथे झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाला दारुण पराभव पत्करावा लागला होता. तर मेलबर्नच्या कसोटी सामन्यातून भारतीय संघाने जोरदार कमबॅक करत कांगारूंवर विजय मिळवला होता. त्यानंतर तिसरा सिडनीतील सामना अनिर्णित राहिला, तर ब्रिस्बेन मधील सामना टीम इंडियाने आपल्या नावावर करून मालिका 2-1 ने जिंकली. मात्र या मालिकेदरम्यान, ऑस्ट्रेलियातील प्रेक्षकांनी भारतीय खेळाडूंवर अश्लील भाष्य केल्याचे आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी मैदानावर पुन्हा एकदा स्लेजिंग केल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता भारतीय संघाचा फिरकीपटू आर अश्विनने ऑस्ट्रेलियात घडलेल्या घटनेसंदर्भात मोठा खुलासा केला आहे. ऑस्ट्रेलिया सोबतच्या तिसऱ्या मालिकेच्या वेळेस आपल्या सोबत भेदभाव झाला असल्याचे अश्विनने म्हटले आहे. 

कांगारूंसोबतच्या सिडनीतील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या वेळेस आपल्या सोबत भेदभाव झाला असल्याचे आर अश्विनने सांगितले आहे. सिडनीतील तिसरा कसोटी सामना होत असताना, यजमान संघाच्या खेळाडूंसोबत लिफ्टमध्ये जाण्याची परवानगी नाकारली असल्याची माहिती टीम इंडियाचा फिरकीपटू आर अश्विनने दिली आहे. कोरोनाच्या कारणामुळे सर्वचजण म्हणजे दोन्ही संघातील खेळाडू जैव सुरक्षित वातावरणात असताना देखील यजमान संघातील खेळाडूंसोबत एकत्रित लिफ्ट मधून जाण्यास रोखण्यात आल्याने वाईट वाटल्याचे अश्विनने सांगितले आहे. 

अश्विनने भारतीय क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांच्याशी यू ट्यूबवर बोलताना याबाबतची माहिती दिली. यावेळेस त्याने सिडनीत पोहचल्यानंतर सर्वांना कठोर निर्बंधांसह बंद करण्यात आल्याचे सांगितले. तसेच भारत आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू जैव सुरक्षित वातावरणात होते. परंतु जेव्हा ऑस्ट्रेलियन खेळाडू लिफ्टमध्ये गेले त्यावेळेस त्यांनी भारतीय खेळाडूंना लिफ्टच्या आत प्रवेश नाकारल्याचे अश्विनने सांगितले. आणि या घटनेमुळे फार विचित्र आणि भेदभाव घडल्यासारखे वाटल्याचे आर अश्विन म्हणाला. 

दरम्यान, सिडनीतील याच कसोटी सामन्यात दुखापत झाली असताना देखील आर अश्विन आणि हनुमा विहारी यांनी अडीच तासापेक्षा जास्त वेळ फलंदाजी करत सामना अनिर्णित राखला होता. या सामन्याच्या वेळेस हनुमा विहारीला देखील दुखापत झाली होती. अश्विन आणि हनुमा विहारी यांनी 259 चेंडूत 62 धावांची भागीदारी केली रचली होती.             

संबंधित बातम्या