आशियाई चँपियन्स लीग सामने गोव्यात

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 11 मार्च 2021

एएफसीने गोव्यातील सामन्यांचे यजमानपद हक्क अखिल भारतीय फुटबॉल महासंघास बहाल केले आहे.

पणजी : आशियाई फुटबॉल महासंघाने (एएफसी) चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील गट ई (पश्चिम विभाग) सामने गोव्यात खेळविण्यास परवानगी दिली आहे. या गटातील सामने येत्या 14 ते 30 एप्रिल या कालावधीत होतील. एएफसीने गोव्यातील सामन्यांचे यजमानपद हक्क अखिल भारतीय फुटबॉल महासंघास बहाल केले आहे. इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत 2019-20 मोसमात लीन विनर्स शिल्ड पटकावून एफसी गोवा आशियाई चँपियन्स लीग स्पर्धेसाठी थेट पात्र ठरणारा पहिला भारतीय संघ ठरला होता. सामने गोव्यात होणार असल्यामुळे एफसी गोवा संघाला गटसाखळी सामने घरच्या मैदानावर खेळायला मिळतील.

ISL 2020-21: मुंबई सिटीस विजेतेपदाची प्रतीक्षा

आशियाई चँपियन्स लीग स्पर्धेच्या ई गटात यजमान एफसी गोवासह इराणचा पर्सेपोलिस एफसी, कतारचा अल रय्यान स्पोर्टस क्लब यांचा समावेश आहे. चौथा संघ अल वाहदा (संयुक्त अरब अमिराती) व अल झावरा (इराक) यांच्यातील प्ले-ऑफ लढतीनंतर निश्चित होईल. हा सामना सात एप्रिलला होईल.

गोव्यातील तीन स्टेडियमवर जैवसुरक्षा वातावरणात गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून 2020-21 मोसमातील आयएसएल स्पर्धेचे यशस्वी आयोजन झाले. या स्पर्धेतील 114 सामने झाले असून अंतिम शनिवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर मुंबई सिटी एफसी व एटीके मोहन बागान यांच्यात खेळला जाईल.

संबंधित बातम्या