गोव्यातील आयोजनाचे `आशियाई फुटबॉल`कडून कौतुक

गोव्यातील आयोजनाचे `आशियाई फुटबॉल`कडून कौतुक
Asian Football appreciates the event in Goa

पणजी: भारतात कोरोना विषाणू महामारीची दुसरी लाट तीव्र होत असताना गोव्यात एएफसी चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या ई (पश्चिम) गटातील सामन्यांचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आशियाई फुटबॉल महासंघाने (एएफसी) अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) व स्थानिक आयोजन समितीचे (एलओसी) कौतुक केले आहे. (Asian Football appreciates the event in Goa)

`एएफसी`चे सचिव दातो विंडसोर जॉन यांनी यशस्वी आयोजनाबद्दल एआयएफएफचे सचिव कुशल दास यांनी सोमवारी पत्र पाठवून शाबासकी दिली. चार संघांचा सहभाग असलेली स्पर्धा गोव्यातील फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर 14 ते 29 एप्रिल या कालावधीत झाली. या कालावधीत एकूण 12 सामने झाले. ई गटात इराणचा पर्सेपोलिस, संयुक्त अरब अमिरातीचा अल वाहदा, कतारचा अल रय्यान यांच्यासह भारतातर्फे पदार्पण करणारा एफसी गोवा या संघांचा समावेश होता. भारतात ही स्पर्धा प्रथमच झाली आणि पहिल्यांदाच भारतीय फुटबॉल क्लबला या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत थेट पात्रता मिळाली होती.

आव्हानात्मक परिस्थितीत एआयएफएफ आणि एलओसी यांची समर्पित वृत्ती, खडतर परिश्रम आणि अथक प्रयत्न यामुळे उच्च दर्जाच्या आयोजनासह यश प्राप्त झाले, असे दातो विंडसोर जॉन यांनी पत्रात नमूद केले असून त्याबद्दल धन्यवादही दिले आहेत. भविष्यातही `एआयएफएफ`कडून `एएफसी`ने असेच सफल सहकार्य अपेक्षिले आहे. स्पर्धेच्या कालावधीत एएफसी प्रतिनिधी आणि सहभागी क्लबची सर्व व्यवस्था, तसेच संबंधित सर्वांचे आरोग्य आणि कल्याण याबाबत कडेकोट सुरक्षा पुरविल्याबद्दल `एएफसी`ने स्पर्धा `एलओसी`प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com