आयएसएल : एटीके मोहन बागानची चेन्नईयीनवर एका गोलने निसटती मात

Copy of Gomantak Banner  (34).jpg
Copy of Gomantak Banner (34).jpg

पणजी : सामन्याच्या इंज्युरी टाईममधील पहिल्याच मिनिटास बदली खेळाडू डेव्हिड विल्यम्स याने नोंदविलेल्या गोलमुळे सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत एटीके मोहन बागानने चेन्नईयीन एफसीवर 1 - 0 फरकाने निसटता विजय मिळविला.

सामना गुरुवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. सामन्याच्या 67व्या मिनिटास मैदानात उतरलेल्या विल्यम्सने 90+1व्या मिनिटास सेटपिसेसवर केलेला गोल कोलकात्याच्या संघास पूर्ण तीन गुण मिळवून देण्यास पुरेसा ठरला. जेवियर हर्नांडेझच्या कॉर्नर किकवर ऑस्ट्रेलियन विल्यम्सने भेदक हेडिंग साधत चेन्नईयीनचा गोलरक्षक विशाल कैथला चकविले.

सामन्यातील शेवटचे काही क्षण बाकी असताना एटीके मोहन बागानच्या टिरी याने चेन्नईयीनच्या एनेस सिपोविच याचा हेडर गोललाईनवरून विफल ठरवत संघाची आघाडी टिकविली. एटीके मोहन बागानचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्ज याने स्पर्धेत आठ सामने एकही गोल न स्वीकारण्याचा पराक्रम साधला.

अंतोनियो हबास यांच्या मार्गदर्शनाखालील एटीके मोहन बागानचा हा स्पर्धेतील सातवा विजय ठरला. 12 लढतीनंतर त्यांचे आता 24 गुण झाले असून पहिल्या क्रमांकावरील मुंबई सिटीपेक्षा दोन गुण कमी आहेत. चेन्नईयीनला चौथा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे साबा लाझ्लो यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचे 13 लढतीनंतर 15 गुण आणि सहावा क्रमांक कायम राहिला.

सामन्याचा पूर्वार्धात बचावात्मक ठरला. दोन्ही संघांनी प्रतिस्पर्धी खोलवर मुसंडी मारणार नाही याची दक्षता घेतली, त्यामुळे सामना रंगतदार ठरू शकला नाही. त्यातच मिळालेल्या संधीही साधता आल्या नाही. सामन्याच्या नवव्या मिनिटास चेन्नईयीनच्या रहीम अलीच्या फटक्याचा नेम चुकला. त्यानंतर 21व्या मिनिटास चेन्नईयीनचा गोलरक्षक विशाल कैथ याने डाव्या बाजूने झेपावत एटीके मोहन बागानच्या जेवियर हर्नांडेझ याचा प्रयत्न उधळून लावला.

सामन्याच्या 73व्या मिनिटास एटीके मोहन बागानला चांगली संधी होती. जेवियर हर्नांडेझचा धोकादायक ठरू पाहणारा फटका चेन्नईयीनच्या मेमो मौरा याने वेळीच रोखला. त्यानंतर लगेच मिनिटाभरात विशाल कैथने पुन्हा एकदा सुरेख कामगिरीने एटीके मोहन बागानचे आक्रमण यशस्वी होऊ दिले नाही. जेवियर हर्नांडेझचा थेट फ्रीकिक फटका त्याने योग्य अंदाज बांधत अडविला.

दृष्टिक्षेपात...

- डेव्हिड विल्यम्सचे यंदा 2 गोल, एकंदरीत 28 आयएसएल सामन्यात 9 गोल

- एटीके मोहन बागानच्या यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक 8 क्लीन शीट्स

- पहिल्या टप्प्यात उभय संघांत 0 - 0 बरोबरी

- यंदाच्या स्पर्धेत एटीके मोहन बागानचे 12 गोल
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com