ISL : एटीके मोहन बागानचा झुंजार विजय

ISL : एटीके मोहन बागानचा झुंजार विजय
Copy of Gomantak Banner (79).jpg

पणजी : फिजीचा हुकमी स्ट्रायकर रॉय कृष्णा याच्या दोन गोलसह एटीके मोहन बागानने उत्तरार्धात तीन वेळा लक्ष्य साधत सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत झुंजार विजयाची नोंद केली. दोन गोलच्या पिछाडीवरून त्यांनी केरळा ब्लास्टर्सला 3-2 फरकाने हरवून जबरदस्त जिगर प्रदर्शित केली.

सामना रविवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. केरळा ब्लास्टर्ससाठी इंग्लंडच्या गॅरी हूपरने 14व्या, तर झिंबाब्वेच्या कॉस्ता न्हामोईनेसू याने 51व्या मिनिटास गोल केला. एटीके मोहन बागानची पिछाडी ब्राझीलियन मार्सेलिन्हो याने 59व्या मिनिटास कमी केल्यानंतर फिजी देशाच्या रॉय कृष्णा याने 65व्या मिनिटास पेनल्टीवर बरोबरी साधून दिली. सामन्याच्या 87व्या मिनिटास कृष्णा याने सामन्यातील वैयक्तिक दुसरा गोल नोंदवत एटीके मोहन बागानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. केरळा ब्लास्टर्सच्या बचावफळीतील चुकीचा लाभ कृष्णाने सुरेखपणे उठविला.

सामना संपण्यास काही मिनिटे बाकी असताना मैदानावरील वातावरण तापले. दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांना भिडले, त्यामुळे रेफरीने एटीके मोहन बागान, तसेच केरळा ब्लास्टर्सच्या खेळाडूंना यलो कार्ड दाखविले.

एटीके मोहन बागानने स्पर्धेतील आठवा विजय नोंदविला. त्यांनी आता 14 लढतीतून 27 गुणांची कमाई केली आहे. अंतोनियो हबास यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचे दुसरे स्थान कायम असून अव्वल स्थानावरील मुंबई सिटीपेक्षा त्यांचे तीन गुण कमी आहेत. किबु व्हिकुना यांच्या मार्गदर्शनाखालील केरळा ब्लास्टर्सची पराभवामुळे अपराजित मालिका पाच लढतीनंतर खंडित झाली. त्यांचा हा 15 लढतीतील सहावा पराभव ठरला. 15 गुणांसह त्यांचा नववा क्रमांक कायम राहिला.

केरळा ब्लास्टर्सची आघाडी

संदीप सिंगच्या असिस्टवर इंग्लिश आघाडीपटू गॅरी हूपर याने छातीवर चेंडू नियंत्रित करून मारलेल्या फटक्यावर गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्ज याला चेंडू अडविणे शक्य झाले नाही. विश्रांतीनंतरच्या सहाव्या मिनिटास झिंबाब्वेचा बचावपटू कॉस्ता न्हामोईनेसू याने केरळा ब्लास्टर्सची आघाडी वाढविली. सहल अब्दुल समदच्या कॉर्नर फटक्यावर राहुल केपी याने हेडिंग साधत चेंडूला कॉस्ताची दिशा दाखविली. त्याचे हेडिंग अगोरच गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्जने अडविले, पण रिबाऊंडवर गोलरक्षकाला फटका रोखता आला नाही.

एटीके मोहन बागानची मुसंडी

दोन गोलच्या पिछाडीवरून एटीके मोहन बागानचे अफलातून मुसंडी मारली. तासाभराच्या खेळात ब्राझीलियन मार्सेलिन्हो याने एटीके मोहन बागानच्या जर्सीत पहिला गोल केला. ओडिशा एफसीकडून जानेवारीतील ट्रान्स्फरमध्ये कोलकात्यातील संघात दाखल झालेल्या 33 वर्षीय आघाडीपटूने मानवीर सिंगच्या असिस्टवर केरळा ब्लास्टर्सचा गोलरक्षक आल्बिनो गोम्सला चकवा दिला. पिछाडी एका गोलने भरून काढल्यानंतर सहा मिनिटांनी एटीके मोहन बागानला पेनल्टी फटका मिळाला. यावेळी केरळा ब्लास्टर्सचा कर्णधार जेसेल कार्नेरो याने चेंडू हाताळला होता. यावेळी रॉय कृष्णा याने अचूक फटका मारताना अजिबात चूक केली नाही.

दृष्टिक्षेपात...

- गॅरी हूपरचा 13 आयएसएल सामन्यात 3 गोल

- कॉस्ता न्हामोईनेसू याचे 11 लढतीत 2 गोल

- मार्सेलिन्हो याचे आयएसएलमध्ये 72 आयएसएल लढतीत 50 गोलमध्ये योगदान, 32 गोल व 18 असिस्ट

- यंदाच्या मोसमात ओडिशाकडून मार्सेलिन्होचा 8 लढतीत एकही गोल नाही, एटीके मोहन बागानकडून पहिल्याच सामन्यात गोल

- रॉय कृष्णा याचे मोसमातील 14 सामन्यात 9 गोल

- कृष्णा याचे एकंदरीत 35 आयएसएल सामन्यात 24 गोल

- केरळा ब्लास्टर्सवर स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यांचे सर्वाधिक 25 गोल

- एटीके मोहन बागानचे केरळा ब्लास्टर्सवर सलग 2 विजय

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com