एफसी गोवा आणि एटीके मोहन बागान यांच्यात आज महत्त्वाचा सामना; आंगुलोविरुद्ध कृष्णा लढतीची उत्सुकता

गोमंतक ऑनलाईन टीम
मंगळवार, 15 डिसेंबर 2020

एटीके मोहन बागान व एफसी गोवा यांच्यातील सामना बुधवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल. या दोन्ही संघांत सध्या दोन गुणांचा फरक आहे. एटीके मोहन बागानचे 10, तर एफसी गोवाचे 8 गुण आहेत.

पणजी- इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात एफसी गोवाचा स्पॅनिश स्ट्रायकर इगोर आंगुलो याने सहा, तर एटीके मोहन बागानचा फिजीयन रॉय कृष्णा याने चार गोल केले आहेत. बुधवारी (ता. 16) दोन्ही खेळाडू प्रतिस्पर्धी असतील, त्यावेळी मॅचविनर कोण ठरणार याची उत्सुकता असेल.

एटीके मोहन बागान व एफसी गोवा यांच्यातील सामना बुधवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल. या दोन्ही संघांत सध्या दोन गुणांचा फरक आहे. एटीके मोहन बागानचे 10, तर एफसी गोवाचे 8 गुण आहेत. पहिल्या तीन लढतीतून फक्त दोन गुण प्राप्त केलेल्या एफसी गोवाने मागील दोन लढतीतून सहा गुणांची कमाई केली आहे. एफसी गोवाने अनुक्रमे केरळा ब्लास्टर्स आणि ओडिशाला हरविले.

एफसी गोवा प्रशिक्षक ज्युआन फेरान्डो यांनी एटीके मोहन बागानविरुद्ध तीन गुणांची अपेक्षा बाळगली असली, तर हा सामना खूप वेगळा आणि महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. मागील दोन लढतीत एटीके मोहन बागानला अपेक्षित निकाल शक्य झाला नाही, तरी त्यांच्यापाशी दर्जेदार खेळाडू असून सेटपिसेसवर ते चांगला बचाव करतात असे निरीक्षण फेरान्डो यांनी प्रतिस्पर्ध्यांविषयी मांडले. आम्ही केवळ कृष्णा याच्यावर लक्ष केंद्रित केलेले नसून एटीके मोहन बागान संघ नजरेसमोर ठेवून व्यूहरचना असेल, असे फेरान्डो यांनी नमूद केले. आपल्या संघातील आंगुलो गोल करत आहे ही बाब खूप समाधानाची आहे, त्याचवेळी अलेक्झांडर रोमारियो, ब्रँडन फर्नांडिस, तसेच इतर खेळाडूंचे योगदानही महत्त्वाचे असल्याचे फेरान्डो म्हणाले. मध्यफळीत लक्षवेधक खेळ करणारा स्पॅनिश जोर्जे ओर्तिझ एफसी गोवासाठी प्रमुख खेळाडू आहे.

स्पॅनिश अंतोनियो लोपेझ हबास यांच्या मार्गदर्शनाखालील एटीके मोहन बागानने ओळीने तीन सामने जिंकून धडाक्यात सुरवात केली, पण मागच्या दोन लढतीत त्यांना फक्त एकच गुण मिळाला. त्यांना जमशेदपूरकडून हार पत्करावी लागली, तर हैदराबादने गोलबरोबरीत रोखले. एफसी गोवाच्या आंगुलो याच्यावर दक्ष पहारा राखण्याचे हबास यांचे डावपेच असतील. कृष्णा याच्याव्यतिरिक्त दोन गोल केलेला एटीके मोहन बागानचा आघाडीपटू मानवीर सिंग याचा धोकाही एफसी गोवाच्या बचावफळीला असेल. संघातील काही खेळाडू दुखापतग्रस्त आहेत, त्याबाबत हबास यांनी चिंता व्यक्त केली आहे.

तयारीसाठी वेळ कमीच...
आयएसएलच्या व्यस्त वेळापत्रकामुळे कमी कालावधीत जास्त सामने खेळावे लागतात. त्यामुळे संघाच्या तयारीसाठी खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफला कमी वेळ मिळत असल्याचे फेरान्डो यांनी स्पष्ट केले, तसेच त्यातून वाट शोधण्याचा प्रयत्न असल्याचेही सांगितले.

दृष्टिक्षेपात
- यंदाच्या आयएसएलमध्ये एफसी गोवाचे 7, एटीके मोहन बागानचे 6 गोल
- एटीके मोहन बागानची 3, तर एफसी गोवाची 1 सामन्यात क्लीन शीट
- गतमोसमात फातोर्डा येथे एफसी गोवा 2-1, तर कोलकाता येथे एटीके 2-0 फरकाने विजयी

संबंधित बातम्या