ISL 2020-21 : एटीके मोहन बागानचा पारंपरिक प्रतिस्पर्धी ईस्ट बंगालवर मोसमात सलग दुसरा विजय

ISL 2020-21 : एटीके मोहन बागानचा पारंपरिक प्रतिस्पर्धी ईस्ट बंगालवर मोसमात सलग दुसरा विजय
ISL ATK

पणजी : भारतीय फुटबॉलमधील शतक महोत्सवी कोलकाता डर्बीत एटीके मोहन बागानने बाजी मारताना इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात पारंपरिक प्रतिस्पर्धी ईस्ट बंगालला सलग दुसऱ्यांदा विजय नोंदविला. त्यांनी 3 - 1 फरकाने सामना सहजपणे जिंकला आणि पाच गुणांच्या आघाडीसह अग्रस्थानही मजबूत केले.

सामना शुक्रवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. फिजी देशाचा स्ट्रायकर रॉय कृष्णाने एटीके मोहन बागानच्या विजयात मोठी भूमिका बजावली. त्याने 15व्या मिनिटास संघाचा पहिला गोल नोंदविला, तर अन्य दोन गोल त्याच्याच असिस्टवर झाले. ऑस्ट्रेलियन डेव्हिड विल्यम्स याने 72व्या, तर स्पॅनिश हावियर हर्नांडेझ याने 89व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला. ईस्ट बंगालचा सामन्यातील एकमेव गोल 41व्या मिनिटास एटीके मोहन बागानचा स्पॅनिश बचावपटू टिरी याच्या स्वयंगोलमुळे नोंदीत झाला. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातही एटीके मोहन बागानने ईस्ट बंगालवर 2 - 0 फरकाने मात केली होती.

अंतोनियो हबास यांच्या मार्गदर्शनाखालील एटीके मोहन बागानचा हा सलग पाचवा, तर 18 लढतीतील एकंदरीत 12वा विजय ठरला. त्यांचे सर्वाधिक 39 गुण झाले असून त्यांनी आता दुसऱ्या क्रमांकावरील मुंबई सिटीवर पाच गुणांची महत्त्वपूर्ण आघाडी प्राप्त केली आहे. ईस्ट बंगालला सातवा पराभव पत्करावा लागला. त्यांचे 18 लढतीनंतर 17 गुण व नववा क्रमांक कायम राहिला.

सामन्याच्या पूर्वार्धात स्पॅनिश बचावपटू टिरी एटीके मोहन बागानसाठी नायक आणि खलनायकही ठरला. रॉय कृष्णाने एटीके मोहन बागानचे गोलखाते टिरी याच्या असिस्टवर उघडले. सहकारी बचावपटकडून चेंडू मिळाल्यानंतर कृष्णाने ईस्ट बंगालच्या बचावफळीत गुंगारा देत शानदार गोलची नोंद केली. त्याने वेगवान धाव राखताना चेंडूवर सुरेख नियंत्रण राखले. कृष्णाचा हा स्पर्धेतील चौदावा गोल ठरला. विश्रांतीला चार मिनिटे बाकी असताना टिरी याच्या स्वयंगोलमुळे ईस्ट बंगालला बरोबरी साधणे शक्य झाले. राजू गायकवाड याचा खोलवरीलथ्रोईन दिशाहीन करण्याच्या प्रयत्नात टिरीने हेडिंगवर चेंडू स्वतःच्याच नेमध्ये मारला.

उत्तरार्धातील कुलिंग ब्रेकला तीन मिनिटे बाकी असताना एटीके मोहन बागानला आघाडी मिळाली. रॉय कृष्णा याच्या असिस्टवर डेव्हिड विल्यम्सने गोलरक्षक सुब्रत पॉलला चेंडू अडविण्याची संधीच दिली नाही. रॉय कृष्णाचा हेडर गोलरक्षक सुब्रत पॉलने रोखल्यानंतर ईस्ट बंगालच्या मॅटी स्टेनमन याने चेंडू कर्णधार डॅनियल फॉक्सच्या दिशेने मारला, यावेळी फॉक्स चेंडूवर ताबा राखू शकला नाही. त्याचा लाभ उठवत कृष्णाने विल्यम्सला गोल करण्याची संधी प्राप्त करून दिली. निर्धारित नव्वद मिनिटांच्या खेळातील एक मिनिट बाकी असताना कृष्णाच्या पासवर हावियर याचे हेडिंग भेदक ठरले आणि एटीके मोहन बागानच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

दृष्टिक्षेपात...

-आयएसएलच्या सातव्या मोसमात गोल्डन बूटसाठी आघाडीवर असलेल्या रॉय कृष्णा याचे 18 लढतीत 14 गोल, 4 असिस्ट

- फिजियन खेळाडूचे आयएसएलच्या दोन मोसमातील 39 सामन्यांत एकूण 29 गोल

- डेव्हिड विल्यम्सचा मोसमातील 15 लढतीत 3 गोल, एकंदरीत आयएसएल स्पर्धेतील 33 सामन्यांत 10 गोल

- हावियर हर्नांडेझ याचा मोसमातील 12 लढतीत 1 गोल, आयएसएलमधील 32 लढतीत एकूण 3 गोल

- एटीके मोहन बागानचे सलग 5 विजय

- एटीके मोहन बागानचे स्पर्धेत 26 गोल

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com