ISL 2020-21 : एटीके मोहन बागानने जमशेदपूरवर विजय मिळवत घेतली अग्रस्थानी झेप 

Copy of Gomantak Banner  - 2021-02-14T225456.610.jpg
Copy of Gomantak Banner - 2021-02-14T225456.610.jpg

पणजी : सामना संपण्यास पाच मिनिटे असताना हुकमी स्ट्रायकर रॉय कृष्णा याच्या प्रेक्षणीय गोलच्या बळावर एटीके मोहन बागानने जमशेदपूरला 1-0 फरकाने हरवून सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत अग्रस्थान संपादले. फिजियन खेळाडूने स्पर्धेत तेराव्या गोलची नोंद केली.

सामना रविवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. जमशेदपूरचा गोलरक्षक टीपी रेहेनेश आणि बचावफळीच्या दक्षतेमुळे एटीके मोहन बागानची आक्रमणे यशस्वी ठरली नाहीत. मात्र 85व्या मिनिटास रॉय कृष्णा याने मुसंडी मारत जमशेदपूरच्या बचावफळीस डेव्हिड विल्यम्सच्या असिस्टवर चकविले. त्याने शानदार गोल करताना प्रतिस्पर्धी कर्णधार पीटर हार्टली आणि गोलरक्षक रेहेनेश या दोघांनाही सणसणीत फटक्यावर हतबल ठरविले. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील पराभवाची परतफेड करणे अंतोनियो हबास यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला शक्य झाले.

एटीके मोहन बागानचा सलग चौथा विजय, तर एकंदरीत 17 लढतीतील अकरावा विजय ठरला. त्यांचे आता सर्वाधिक 36 गुण झाले असून मुंबई सिटीवर दोन गुणांची आघाडी प्राप्त केली आहे. पराभवामुळे जमशेदपूरच्या प्ले-ऑफ फेरीच्या आशांना धक्का बसला आहे. त्यांचा हा 18 लढतीतील सातवा पराभव ठरला. त्यामुळे ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचे 21 गुण आणि सहावा क्रमांक कायम राहिला.

पूर्वार्ध संपण्यास सात मिनिटे बाकी असताना एटीके मोहन बागानला आघाडीची सुरेख संधी होती, पण डेव्हिड विल्सम्सचा धोकादायक हेडर जमशेदपूरचा गोलरक्षक टीपी रेहेनेश याने उजवीकडे झेपावत विफल ठरविला. त्यानंतर कोलकात्यातील संघाच्या मार्सेलिन्हो याचा प्रयत्न जमशेदपूरच्या रिकी लाल्लॉमॉमा याने वेळीच उधळून लावल्यामुळे विश्रांतीला गोलशून्य बरोबरीची कोंडी कायम राहिली.

उत्तरार्धातील खेळ सुरू झाल्यानंतर पाच मिनिटांनी डेव्हिड विल्सम्सला जमशेदपूरचा लाल्डिनलियाना रेन्थलेई भारी ठरल्यामुळे एटीके मोहन बागानला यश मिळाले नाही. तासाभराच्या खेळानंतर मार्सेलिन्होच्या असिस्टवर रॉय कृष्णाचा भेदक फटका रेहेनेशने दक्ष राहत रोखल्यामुळे जमशेदपूरचे नुकसान झाले नाही.

लेनी रॉड्रिग्जचे शतक

जानेवारीतील ट्रान्स्फरमध्ये एफसी गोवाकडून एटीके मोहन बागान संघात दाखल झालेला गोमंतकीय 33 वर्षीय मध्यरक्षक लेनी रॉड्रिग्ज याने रविवारी आयएसएल स्पर्धेत सामन्यांचे शतक नोंदविले. जमशेदपूरविरुद्ध तो शंभरावा सामना खेळला. तो पुणे सिटीतर्फे 29, बंगळूर एफसीतर्फे 17, एफसी गोवाकडून 51, तर एटीके मोहन बागानकडून तीन सामने खेळला आहे. आयएसएलमध्ये लेनीने चार गोल व दोन असिस्ट अशी कामगिरी बजावली आहे.

दृष्टिक्षेपात...

- रॉय कृष्णाचे मोसमातील 17 सामन्यात सर्वाधिक 13 गोल, एकंदरीत 38 आयएसएल सामन्यात 28 गोल

- एटीके मोहन बागानचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्जच्या 17 लढतीत 10 क्लीन शीट्स

- एटीके मोहन बागानचे यंदा सर्वाधिक 11 विजय

- पहिल्या टप्प्यात जमशेदपूरची एटीके मोहन बागानवर 2-1 फरकाने मात
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com