भक्कम अरिंदमसमोर चेन्नईयीन निष्प्रभ

दैनिक गोमन्तक
बुधवार, 30 डिसेंबर 2020

अनुभवी गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्ज याच्या नेटसमोरील भक्कम आणि जागरुक पहाऱ्यामुळे चेन्नईयीन एफसीची आक्रमणे मंगळवारी निष्प्रभ ठरली,

पणजी :  अनुभवी गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्ज याच्या नेटसमोरील भक्कम आणि जागरुक पहाऱ्यामुळे चेन्नईयीन एफसीची आक्रमणे मंगळवारी निष्प्रभ ठरली, त्यामुळे इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात एटीके मोहन बागानने पहिलीच गोलशून्य बरोबरी नोंदविली.

सामना बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर झाला. एटीके मोहन बागानचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्ज याने मंगळवारी डोळ्यांचे पारणे फेडणारे कसब प्रदर्शित करत मजबूत तटबंदी राखली. त्याची अफलातून चपळाई आणि एकाग्रतेमुळे चेन्नईयीनची आक्रमणे वारंवार फोल ठरली. तोच सामन्याचा मानकरी ठरला. यंदाच्या स्पर्धेतील सहाव्या लढतीत त्याने एकही गोल न स्वीकारण्याचा पराक्रम बजावला.

बरोबरीच्या एका गुणामुळे एटीके मोहन बागानला आता 17 गुणांसह अग्रस्थान मिळाले आहे, पण त्यांना मुंबई सिटी एफसीवर फक्त एका गुणाची आघाडी मिळाली आहे. त्यांची ही आठ लढतीतील दुसरीच बरोबरी ठरली. चेन्नईयीन एफसीचा ही आठ लढतीतील चौथी बरोबरी ठरली, त्यामुळे त्यांचे 10 गुण झाले असून सातवे स्थान कायम आहे. एटीके मोहन बागान, तसेच चेन्नईयीन एफसीचा हा सलग चौथा अपराजित सामना ठरला.

पूर्वार्धातही गोलशून्य बरोबरीची कोंडी कायम राहीली. एटीके मोहन बागानचे प्रशिक्षक अंतोनियो लोपेझ हबास यांनी रॉय कृष्णा, डेव्हिड विल्यम्स व मानवीर सिंग या आक्रमकांना सुरवातीपासून संधी दिली, मात्र चेन्नईयीनच्या बचावफळीने या त्रिकुटास मोकळीक दिली नाही. तुलनेत चेन्नईयीन एफसीचा जास्त भर आक्रमणावर होता, पण एटीके मोहन बागानचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्ज लौकिकास जागला. सामन्याच्या पाचव्याच मिनिटास अरिंदमने चेन्नईयीनचे आक्रमण हाणून पाडताना राफेल क्रिव्हेलारो याच्या फटक्यास यश मिळू दिले नाही.  

विश्रांतीनंतरच्या पाचव्या मिनिटास चेन्नईयीन संघ आघाडीच्या जवळपास आला होता, मात्र लाल्लियानझुआला छांगटे याच्या फटक्यावर डाव्या बाजूने  झेपावत अरिंदमने चेंडू नेटमध्ये जाणार नाही याची दक्षता घेतली. तासाभराच्या खेळानंतर अरिंदमने नेटसमोर अफलातून गोलरक्षण कौशल्य प्रदर्शित करताना चेन्नईयीनच्या मेमो मौरा याचा सणसणीत फ्रीकिक फटका गोलपट्टीवरून बाहेर टाकला. सामना संपण्यास दहा मिनिटे बाकी असताना रिगन सिंगच्या फटक्यावर अरिंदमने उजव्या बाजूला झेपावत संघावरील संकट टाळले.

 

दृष्टिक्षेपात...

- एटीके मोहन बागानचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्ज याच्या 8 लढतीत 6 क्लीन शीट

- एटीके मोहन बागानच्या यंदा 2 बरोबरी, त्यात 1 गोलशून्य

- चेन्नईयीन एफसीची स्पर्धेत आता 3 क्लीन शीट

- चेन्नईयीनच्या स्पर्धेत 4 बरोबरी, त्यापैकी 3 गोलशून्य

संबंधित बातम्या