'आयएसएल'मध्ये 'एफसी गोवा'ला हरवून एटीके मोहन बागान दुसऱ्या स्थानावर

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 17 डिसेंबर 2020

 सामना संपण्यास पाच मिनिटे असताना रॉय कृष्णा याने पेनल्टी स्पॉटवरून अचूक फटका मारत एटीके मोहन बागानला आघाडी मिळवून दिली.

पणजी :  सामना संपण्यास पाच मिनिटे असताना रॉय कृष्णा याने पेनल्टी स्पॉटवरून अचूक फटका मारत एटीके मोहन बागानला आघाडी मिळवून दिली. त्या बळावर कोलकात्याच्या संघाने एफसी गोवा संघास 1-0 फरकाने हरवून काल इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील चौथ्या विजयाची नोंद केली. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या या हाय व्हॉल्टेज सामन्यात कृष्णाने 85व्या मिनिटास एफसी गोवाचा गोलरक्षक महंमद नवाझ याला चकविले. फिजीयन कृष्णाचा हा यंदाच्या स्पर्धेतील पाचवा गोल ठरला. चेंडूसह मुसंडी मारलेल्या रॉय कृष्णाला पाडण्याची बदली खेळाडू ऐबन डोहलिंग याची चूक एफसी गोवास फारच महागात पडली. इंज्युरी टाईमच्या शेवटच्या मिनिटास एटीके मोहन बागान संघ नशिबवान ठरला. अगोदर सेवियर गामा याचा ताकदवान फटका गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्ज याने अतिशय चपळाईने अडविला, तर लगेच एदू गामाचा हेडर कमकुवत ठरल्यामुळे एफसी गोवाची बरोबरीची शेवटची संधी हुकली.

 

त्यापूर्वी 80व्या मिनिटास एफसी गोवाचा बदली खेळाडू जॉर्जे ओर्तिझ याने एटीके मोहन बागानच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारली होती, त्याला कार्ल मॅकह्यूज याने रोखण्याचा प्रयत्न केला होता, पण रेफरींनी पेनल्टीचे अपील उचलून धरले नाहीत. एटीके मोहन बागानचा हा सहा लढतीतील चौथा विजय ठरला. त्यांचे आता अग्रस्थानावरील मुंबई सिटीइतकेच 13 गुण झाले आहेत, मात्र गोलसरासरीत कोलकात्याचा संघ दुसऱ्या स्थानी राहिला. एफसी गोवास दुसरा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सहा लढतीनंतर त्यांचे आठ गुण कायम राहिले. ते सहाव्या क्रमांकावर कायम राहिले. विश्रांतीस पाच मिनिटे बाकी असताना एटीके मोहन बागानला आघाडीची चांगली संधी होती, पण ऑस्ट्रेलियन डेव्हिड विल्यम्सच्या फटक्याआड गोलपोस्ट आला. अंतोनियो लोपेझ हबास यांनी संघाचे आक्रमण जास्त धारदार करताना रॉय कृष्णा व मानवीर सिंग यांच्यासमवेत डेव्हिड विल्यम्सला खेळविले, मात्र पूर्वार्धात एफसी गोवाचा बचाव भेदणे त्यांना शक्य झाले नाही.

 

विश्रांतीनंतरच्या अकराव्या मिनिटास एफसी गोवाने चांगली मुसंडी मारली होती. अलेक्झांडर जेसूराजच्या शानदार क्रॉसपासवर आल्बर्टो नोगेराचा हेडर थेट गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्ज याच्या हाती गेल्याने गोलशून्य बरोबरीची कोंडी कायम राहिली.

 

दृष्टिक्षेपात...

- आयएसएलमध्ये एटीके मोहन बागानचे एफसी गोवावर 15 लढतीत 6 विजय

- रॉय कृष्णाचे यंदा 5 गोल, आयएसएलमध्ये एकूण 20 गोल

- एटीके मोहन बागानचा गोलरक्षक अरिंदर भट्टाचार्ज याची 4 सामन्यात क्लीन शीट
 

संबंधित बातम्या