विल्यम्सचा गोल `एटीकेएमबी`साठी निर्णायक ; बंगळूरची 'आयएसएल'मधील विजयी मालिका खंडित

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 22 डिसेंबर 2020

ऑस्ट्रेलियन स्ट्रायकर डेव्हिड विल्यम्स याच्या प्रेक्षणीय गोलमुळे एटीके मोहन बागान (एटीकेएमबी) संघाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील बंगळूर एफसीची अपराजित आगेकूच काल खंडित केली. कोलकात्याच्या संघाने सामना 1-0 फरकाने जिंकला.

पणजी : ऑस्ट्रेलियन स्ट्रायकर डेव्हिड विल्यम्स याच्या प्रेक्षणीय गोलमुळे एटीके मोहन बागान (एटीकेएमबी) संघाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील बंगळूर एफसीची अपराजित आगेकूच काल खंडित केली. कोलकात्याच्या संघाने सामना 1-0 फरकाने जिंकला. सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. एटीके मोहन बागानच्या डेव्हिड विल्यम्सने 33व्या मिनिटास गोल केला. अंतोनियो लोपेझ हबास यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचा हा सात सामन्यांतील पाचवा विजय ठरला. त्यांचे आता 16 गुण झाले असून त्यांनी अव्वल स्थानावरील मुंबई सिटी एफसीला गाठले आहे. गोलसरासरीत कोलकात्याचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. कार्ल्स कुआद्रात यांच्या मार्गदर्शनाखालील बंगळूरला मोसमातीस सात लढतीत पहिलाच पराभव पत्करावा लागला. त्यांचे 12 गुण व तिसरा क्रमांक कायम आहे.

 

अर्ध्या तासाच्या खेळानंतर एटीके मोहन बागानच्या डेव्हिड विल्यम्सने गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडताना अप्रतिम कौशल्य प्रदर्शित केले. या 32 वर्षीय ऑस्ट्रेलियन आघाडीपटूचा हा यंदाच्या आयएसएल स्पर्धेतील पहिलाच गोल ठरला. तीस मिनिटांच्या कुलिंग ब्रेकनंतर गोलक्षेत्राच्या डाव्या बाजूने कार्ल मॅकह्यूज याने दिलेल्या पासवर विल्यम्सने चेंडू नियंत्रित केला, नंतर बंगळूरचा बचावपटू हरमनज्योत खबर याला चकवा देत सणसणीत फटक्यावर बंगळूरचा अनुभवी गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याचाही बचाव भेदला. सामन्यात एटीके मोहन बागानच्या रॉय कृष्णा आणि डेव्हिड विल्यम्स जोडीसह मानवीर सिंगनेही बंगळूरच्या बचावफळीवर वारंवार दबाव टाकला. अपेक्षेनुसार कोलकात्यातील संघाचे आक्रमण वरचढ ठरले. शिवाय त्यांचा बचावही भक्कम ठरल्यामुळे मोसमात पाचव्यांदा त्यांनी सामन्यात एकही गोल स्वीकारला नाही. तासाभराच्या खेळानंतर कुआद्रात यांनी बंगळूरच्या संघात एकदम तीन बदल केले, पण त्याचा अपेक्षित परिणाम दिसला नाही.

 

दृष्टिक्षेपात...

- ऑस्ट्रेलियन डेव्हिड विल्यम्सचे आता 23 आयएसएल सामन्यात 8 गोल

- 32 वर्षीय खेळाडूचे गतमोसमात एटीके एफसीतर्फे 7 गोल व 5 असिस्ट, यंदा पहिलाच गोल

- एटीके मोहन बागानचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्जकडून मोसमात 5 लढतीत क्लीन शीट

- गतमोसमातील होम लढतीतही एटीकेचा बंगळूरवर 1-0 फरकाने विजय
 

संबंधित बातम्या