ऐतिहासिक कोलकाता डर्बीत एटीके मोहन बागानचे वर्चस्व

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

एटीके मोहन बागानने सामन्याच्या उत्तरार्धात दोन गोल नोंदवत इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील पहिल्या ऐतिहासिक कोलकाता डर्बीत वर्चस्व राखले. पारंपरिक प्रतिस्पर्धी ईस्ट बंगालवर 2-0 फरकाने मात करून सलग दुसऱ्या लढतीत पूर्ण तीन गुणांची कमाई केली.

पणजी :  एटीके मोहन बागानने सामन्याच्या उत्तरार्धात दोन गोल नोंदवत इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील पहिल्या ऐतिहासिक कोलकाता डर्बीत वर्चस्व राखले. पारंपरिक प्रतिस्पर्धी ईस्ट बंगालवर 2-0 फरकाने मात करून सलग दुसऱ्या लढतीत पूर्ण तीन गुणांची कमाई केली.

सामना काल वास्को येथील टिळक मैदानावर झाला. रॉय कृष्णाने 49व्या, तर बदली खेळाडू मानवीर सिंग याने 85व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल करून एटीके मोहन बागानसाठी आयएसएलमधील पहिलीच कोलकाता डर्बी संस्मरणीय ठरविली. अंतोनियो लोपेझ हबास यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचा हा सलग दुसरा विजय असून 6 गुणांसह त्यांनी आता गुणतक्त्यात अग्रस्थान मिळविले आहे. रॉबी फावलर यांच्या मार्गदर्शनाखालील ईस्ट बंगालला आयएसएल पदार्पणात पराभवाचा सामना करावा लागला.

पूर्वार्धातील गोलशून्य बरोबरीची कोंडी उत्तरार्ध सुरू झाल्यानंतर लगेच फुटली. फिजी देशाचा आंतरराष्ट्रीय स्ट्रायकर रॉय कृष्णा पुन्हा एकदा संघाच्या मदतीस धावून आला. केरळा ब्लास्टर्सविरुद्धही त्याने सामन्याच्या उत्तरार्धात या 33 वर्षीय खेळाडूने गोल केला होता. शुक्रवारी तीच पुनरावृत्ती झाली. विश्रांतीनंतरच्या चौथ्या मिनिटास कृष्णाने ईस्ट बंगालचा बचाव भेदताना एटीके मोहन बागान संघास 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. ईस्ट बंगालच्या बचावपटूचा पास चुकल्यानंतर चेंडूवर ताबा राखत कृष्णाने सणसणीत फटक्यावर प्रतिस्पर्धी गोलरक्षक देबजित मजुमदार याला हतबल ठरविले.

गतमोसमात एफसी गोवाकडून गतमोसमात यशस्वी ठरलेल्या मानवीरने यंदाच्या आयएसएलमधील पहिला गोल नोंदवत एटीके मोहन बागानची आघाडी 2-0 अशी भक्कम केली. प्रबीर दास याच्या असिस्टवर शानदार सोलो प्रयत्नावर मानवीरचा फटका अचूक ठरला. हा 25 वर्षीय आघाडीपटू 63व्या मिनिटास डेव्हिड विल्यम्सच्या जागी मैदानात आला होता.

सामन्याच्या पहिल्या 45 मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांचे समप्रमाणात वर्चस्व राखले, मात्र एटीके मोहन बागानच्या (146) तुलनेत ईस्ट बंगालचे (259) जास्त पास होते. संधी होत्या, परंतु त्यांचा लाभ उठविणे शक्य न झाल्यामुळे पूर्वार्धाच्या अखेरीस गोलफरक कोराच राहिला.

रॉय कृष्णाच्या गोलनंतर 63व्या मिनिटास ईस्ट बंगालने एटीके मोहन बागानच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारली. अँथनी पिल्किंग्टन याच्या पासवर जॅक माघोमा चेंडूवर नियंत्रण राखू शकला नाही, त्यामुळे त्याचा फटका गोलपट्टीवरून गेल्यानंतर संधी हुकली. त्यानंतर 74व्या मिनिटास गोलरक्षक मजुमदार दक्ष राहिल्याने एटीके मोहन बागानला आघाडी वाढविता आली नाही. सामना संपण्यास आठ मिनिटे बाकी असताना एटीके मोहन बागानचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्य याचा बचाव भक्कम ठरला. त्यामुळे ईस्ट बंगालच्या अँथनी पिल्किंग्टन याचा प्रयत्न विफल ठरला.

 

दृष्टिक्षेपात...

- रॉय कृष्णा याचे यंदाच्या आयएसएल स्पर्धेत आता 2 गोल

- एटीके मोहन बागानच्या हुकमी स्ट्रायकरचे 23 आयएसएल सामन्यांत एकूण 17 गोल

- मानवीर सिंग याचे आयएसएल स्पर्धेतील 49 लढतीत 4 गोल, यापूर्वीचे 3 गोल एफसी गोवातर्फे

- यंदाच्या आयएसएलमध्ये एटीके मोहन बागानचे एकूण 3 गोल

- कोलकाता डर्बीत मोहन बागानचे ईस्ट बंगालवर 119 विजय

अधिक वाचा :

न्यूझीलंडमध्ये क्रिकेट मालिकेसाठी दाखल झालेले पाकिस्तानचे खेळाडू बेशिस्त

कर्णधार विराट कोहलीदेखील रोहितच्या दुखापतीबाबत साशंक

आयएसएलमध्ये फॉर्म परत मिळवण्यासाठी एफसी गोवाचा संघर्ष

 

संबंधित बातम्या