एटीके मोहन बागानची मुसंडी ; नॉर्थईस्ट युनायटेडला हरवून 'आयएसएल'मध्ये पुन्हा अव्वल स्थानी

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 4 जानेवारी 2021

एटीके मोहन बागानने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात मुसंडी मारताना पुन्हा एका अग्रस्थान मिळविले. उत्तरार्धातील गोलच्या बळावर त्यांनी नॉर्थईस्ट युनायटेडला 2-0 फरकाने हरविले.

पणजी  :  एटीके मोहन बागानने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात मुसंडी मारताना पुन्हा एका अग्रस्थान मिळविले. उत्तरार्धातील गोलच्या बळावर त्यांनी नॉर्थईस्ट युनायटेडला 2-0 फरकाने हरविले. सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर काल झाला. फिजी देशाचा रॉय कृष्णा याने 51व्या मिनिटास गोल केल्यानंतर, नॉर्थईस्ट युनायटेडचा कर्णधार बेल्जियन खेळाडू बेंजामिन लॅम्बॉट याच्या स्वयंगोलमुळे 58व्या मिनिटास एटीके मोहन बागानच्या खाती दुसऱ्या गोलची नोंद झाली. यंदाच्या स्पर्धेतील सात सामन्यांत एकही गोल न स्वीकारण्याचा पराक्रम कोलकात्याच्या संघाने बजावला आहे.

एटीके मोहन बागानचा हा नऊ लढतीतील सहावा विजय ठरला. त्यांचे आता 20 गुण झाले असून दुसऱ्या क्रमांकावरील मुंबई सिटीवर एका गुणाची निसटती आघाडी संपादली आहे. नॉर्थईस्टचा हा नऊ लढतीतील दुसरा पराभव ठरला. त्यामुळे त्यांचे 11 गुण आणि सहावा क्रमांक कायम आहे. पूर्वार्धातील गोलशून्य 45 मिनिटानंतर, उत्तरार्धात सात मिनिटांच्या अंतराने एटीके मोहन बागानची स्थिती बळकट झाली. फिजी देशाचा स्ट्रायकर रॉय कृष्णा याच्या सुरेख हेडिंगमुळे कोलकात्याच्या संघाने आघाडी मिळविली. सेटपिसेसवर टिरी याच्या असिस्टवर कृष्णा याने चेंडूला हेडिंगने अचूक दिशा दाखवत गोलरक्षक गुरमीत याला चकविले. यावेळी एदू गार्सिया याच्या झंझावाती कॉर्नर किकवर स्पॅनिश खेळाडू टिरी याने चेंडू कृष्णाकडे सोपविला होता. नंतर एदू गार्सियाच्या कॉर्नर किकवर चेंडू एटीके मोहन बागानच्या संदेश झिंगन यश मिळू नये या प्रयत्नात नॉर्थईस्टचा कर्णधार बेंजामिन लॅम्बॉट याने चूक केली. त्याच्या स्वयंगोलमुळे एटीके मोहन बागानच्या खाती दुसऱ्या गोलची नोंद झाली.

सामन्याच्या 71व्या मिनिटास गुवाहाटीच्या संघास पिछाडी कमी करण्याची चांगली संधी होती. एटीके मोहन बागानच्या संदेश झिंगन याने इद्रिसा सिला याला अडथळा आणल्यानंतर नॉर्थईस्टला फ्रीकिक फटका मिळाला. फेडेरिको गालेगो याने मारलेला झणझणीत फटका गोलपट्टीस आपटल्यामुळे एटीके मोहन बागानवर सलग चौथ्या सामन्यात गोल झाला नाही.

 

दृष्टिक्षेपात...

- रॉय कृष्णा याचा यंदाच्या स्पर्धेत 6 गोल

- फिजी देशाच्या 33 वर्षीय कृष्णाचे आयएसएलधील 30 सामन्यात एकूण 21 गोल

- एटीके मोहन बागान व गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्ज यांची स्पर्धेत एकंदरीत 7, तर सलग 4 क्लीन शीट

- एटीके मोहन बागान ओळीने 5 सामन्यांत अपराजित, 3 विजय, 2 बरोबरी

संबंधित बातम्या