एटीके मोहन बागानचा इंज्युरी टाईमच्या शेवटच्या मिनिटास गोल; ओडिशाची एका गोलने हार

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

फिजी देशाचा हुकमी स्ट्रायकर रॉय कृष्णाने याने चार मिनिटांच्या इंज्युरी टाईममधील शेवटच्या मिनिटास साधलेल्या भेदक हेडिंगमुळे एटीके मोहन बागानने गुरुवारी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदविला.

पणजी :  फिजी देशाचा हुकमी स्ट्रायकर रॉय कृष्णाने याने चार मिनिटांच्या इंज्युरी टाईममधील शेवटच्या मिनिटास साधलेल्या भेदक हेडिंगमुळे एटीके मोहन बागानने गुरुवारी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदविला. त्यांनी झुंजार खेळ केलेल्या ओडिशा एफसीवर 1-0 अशा निसटत्या फरकाने मात केली.

सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. ओडिशाचा गोलरक्षक कमलजित सिंग याने कृष्णाचा हेडर रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण यश न आल्याने एटीके मोहन बागानची तीन गुण निश्चित झाले. कृष्णाच सामन्याचा मानकरी ठरला. सलग तिसऱ्या विजयामुळे अंतोनियो लोपेझ हबास यांच्या मार्गदर्शनाखालील कोलकात्याच्या संघाने नऊ गुणांसह अव्वल स्थान मिळविले आहे. त्यांनी ओळीने तिसऱ्या लढतीत क्लीन शीट राखली. दुसऱ्या पराभवामुळे ओडिशाच्या खाती तीन लढतीनंतर एक गुण आणि दहावा क्रमांक कायम राहिला.

त्यापूर्वी, ओडिशाच्या कोल अलेक्झांडर याने 56व्या मिनिटास स्वयंगोल केला होता, मात्र चेंडू एटीके मोहन बागानच्या मानवीर सिंगच्या हाताला लागल्याचे रेफरी अजितकुमार मेतेई यांच्या लक्षात आल्याने गोलफरक कोराच राहिला.

सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांनी प्रतिस्पर्ध्यांच्या रिंगणात मुसंडी मारली, पण प्रयत्न अपयशीच ठरले. एटीके मोहन बागानचा रॉय कृष्णा याला दोन वेळा संघाला आघाडी मिळवून देण्याची संधी होती, पण अनुक्रमे 24 व 45व्या मिनिटास तो यशस्वी ठरू शकला नाही. ओडिशाच्या जेकब याचा हेडर दिशाहीन ठरल्यामुळे 35व्या मिनिटास त्यांची चांगली संधी हुकली.

 

भन्नाट रॉय कृष्णा...

- आयएसएलच्या सातव्या मोसमात 3 लढतीत 3 गोल

- आयएसएलमध्ये आता 24 सामन्यांत एकूण 18 गोल

- गतमोसमातील आयएसएल स्पर्धेत 15 गोल

 

अधिक वाचा :

 

 विश्‍वकरंडक सुपर लीग क्रमवारीत  क्रमवारीत झिम्बाब्वे, आयर्लंडही टीम इंडियापेक्षा सरस ; ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानी

भारत - ऑस्ट्रेलियाच्या टी २० लढतीही हाऊसफुल? 

ऑस्ट्रेलियात `भोळें`कडे केला विराटने ब्रेकफास्ट

संबंधित बातम्या