लक्षवेधी फलंदाजीने छाप पाडलेला सुयश

Dainik Gomantak
रविवार, 31 मे 2020

गुजरातविरुद्ध दुसऱ्या डावात सुयशला तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळाली. संधीचा पूरेपूर लाभ उठवताना त्याने ६६ धावांची शैलीदार खेळी केली.

किशोर पेटकर

पणजी 

गोव्याचा युवा फलंदाज सुयश प्रभुदेसाई यांच्यासाठी २०१९-२० रणजी क्रिकेट मोसम लक्षवेधी ठरला. या २२ वर्षीय शैलीदार फलंदाजाने प्लेट गटात धावांचा रतीब टाकलाच, याशिवाय स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतीत बलाढ्य गुजरातविरुद्ध झुंजार अर्धशतकही केले.

गुजरातविरुद्ध दुसऱ्या डावात सुयशला तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळाली. संधीचा पूरेपूर लाभ उठवताना त्याने ६६ धावांची शैलीदार खेळी केली, गोव्यातर्फे या सामन्यातील सर्वाधिक वैयक्तिक धावा ठरल्या. शिवाय पहिल्या डावात सातव्या क्रमांकावर त्याने नाबाद २४ धावाही केल्या होत्या.

सुयशने २०१९-२० मोसमातील रणजी करंडक स्पर्धेत १० सामन्यांत ७०.६६च्या सरासरीने १ शतक आणि ५ अर्धशतकांच्या मदतीने ६३६ धावा केल्या. पार्ट टाईम मध्यमगती गोलंदाजीने ४ गडीही बाद केले.

सुयशने रणजी कारकिर्दीतील पहिले शतक बिहारविरुद्ध गतमोसमातच नोंदविले. पटना येथे झालेल्या लढतीत त्याने पहिल्या डावात १३५ धावांची खेळी केली. त्यामुळे गोव्याला त्या लढतीत पहिल्या डावात १४४ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. याशिवाय स्पर्धेत दोन वेळा नर्व्हस नाईन्टीजचा बळी ठरल्यामुळे त्याला शतकाने हुलकावणी दिली. तो सिक्कीमविरुद्ध ९१, तर चंडीगडविरुद्ध ९० धावांवर बाद झाला.

गतमोसमातील २३ वर्षांखालील एकदिवसीय स्पर्धेत सुयशने गोव्याचे नेतृत्व केले. चार सामन्यांत त्याने दोन अर्धशतके केली. हरियानाविरुद्ध नाबाद ५२, तर हिमाचलविरुद्ध ८० धावांची खेळी केल्यानंतर त्याची सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० स्पर्धेसाठी गोव्याच्या सीनियर संघात निवड झाली. त्या स्पर्धेतील पहिल्या लढतीत गोव्याने बडोद्यास पराभवाचा धक्का दिला, त्यात सुयशची नाबाद ६० धावांची खेळी निर्णायक ठरली. गतमोसमात विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेतही तो खेळला.

दोन मोसमापूर्वी, २० ते २३ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत रोहतक येथे हरियानाविरुद्ध सुयशने गोव्यातर्फे रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण केले. गतमोसमात प्लेट गटातील कमकुवत संघांविरुद्ध त्याने धावा केल्याच, शिवाय गुजरातसारखा बलाढ्य संघ, चंडीगड, बिहारसारख्या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांविरुद्धही धावांचा ओघ कायम राखत सुयशने अपेक्षा उंचावल्या.

 

सुयश प्रभुदेसाईची रणजी कारकीर्द

- सामने  १६, डाव : २४

- धावा : ९२२, सर्वोच्च : १३५, सरासरी : ४३.९०

- शतक : १, अर्धशतके : ६, विकेट्स : ४

संबंधित बातम्या