कोरोना महामारीची परिस्थितीत स्टेडियममध्ये प्रेक्षक कधी दिसू लागतील हे सांगणे कठीण

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

या कोरोना महामारीने परिस्थिती कठीण बनवली आहे. त्यामुळे आपल्या देशात स्टेडियममध्ये प्रेक्षक कधी दिसू लागतील हे मी सांगू शकत नाही, असे रिजिजू यांनी सांगितले. 

नवी दिल्ली: ‘अनलॉक ४’ मध्ये १०० जणांना खेळाच्या मैदानावर उपस्थित राहाण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली असली तरी खुद्द क्रीडामंत्री किरेन रिजिजू साशंक आहेत. स्टेडियमध्ये प्रेक्षक कधी परततील हे सांगू शकत नाही, असे रिजिजू यांनी म्हटले आहे.

माजी फुटबॉल कर्णधार बायचुंग भुटियाने ऑनलाईन फुटबॉल प्रशिक्षणासाठी तयार केलेल्या ॲपचे अनावरण रिजिजूंच्या हस्ते झाले. या कोरोना महामारीने परिस्थिती कठीण बनवली आहे. त्यामुळे आपल्या देशात स्टेडियममध्ये प्रेक्षक कधी दिसू लागतील हे मी सांगू शकत नाही, असे रिजिजू यांनी सांगितले. 

मुळात कोरोना महामारीची परिस्थिती पुढील एक-दोन महिन्यांत कशी असेल हेच सांगता येणे कठीण आहे. प्रेक्षकांच्या उपस्थितीत सामने व्हावे ही माझीही इच्छा आहे. हे लवकरात लवकर घडावे अशी इच्छा आहे, परंतु जनतेच्या आरोग्याची सुरक्षा सर्वाधिक महत्त्वाची आहे, असे क्रीडा मंत्र्यांनी सांगितले. 

अनलॉक- ४ ची घोषणा करताना काही बंधने शिथिल करण्यात आली आहेत, त्यानुसार क्रीडा कार्यक्रमात १०० लोकांना उपस्थित राहाण्याची परवानगी देण्यात आली आहे. २१ सप्टेंबरपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे; परंतु प्रत्येकाने मास्क वापरणे, एकमेकांमध्ये अंतर ठेवणे, शरीराचे तापमान तपासणे आणि हात निर्जंतूक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. प्रत्येक राज्य आणि स्थानिक संघटना आणि सरकार यांनी मिळून स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश देण्याचा निर्णय घ्यायचा आहे. आपला देश एवढा मोठा आहे प्रत्येक राज्य, शहरांमधली परिस्थिती वेगवेगळी आहे, त्यामुळे एकच नियम सर्वांसाठी कायम राहू शकत नाही. त्यामुळे केंद्रांने तयार केलेल्या नियमांच्या चौकटीत राहून स्थानिक संघटनांनी निर्णय घ्यायचा आहे, असे क्रीडामंत्री म्हणाले.

नकारात्मक विचारांना महत्व देत नाही
२०२८ च्या ऑलिंपिक स्पर्धेत पहिल्या १० संघांत आपल्या स्थान मिळवायचे हे उद्दिष्ट आम्ही जाहीर केल्यावर अनेकांनी टीका केली, हे कसे शक्‍य आहे, असाही सूर लावला, अशी नकारात्मकता चांगली नाही, प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, त्यामुळे अशा नकारात्मक मतांना प्रतिक्रिया देणे महत्त्वाचे नाही, असे रिजिजू यांनी सांगितले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या