'विराट कोहली हा जणू ऑस्ट्रेलियनच आहे'

वृत्तसंस्था
शनिवार, 12 डिसेंबर 2020

विराट कोहली कमालीचा आक्रमक आहे. त्याच्यामुळे कसोटीतील रस कायम आहे. तो जणू ऑस्ट्रेलियन आहे, या शब्दात महान फलंदाज ग्रेग चॅपेल यांनी भारतीय कर्णधारास गौरवले.

ॲडलेड :  विराट कोहली कमालीचा आक्रमक आहे. त्याच्यामुळे कसोटीतील रस कायम आहे. तो जणू ऑस्ट्रेलियन आहे, या शब्दात महान फलंदाज ग्रेग चॅपेल यांनी भारतीय कर्णधारास गौरवले. भारताचे यापूर्वीचे अनेक क्रिकेट संघात महात्मा गांधीचे तत्त्वज्ञान दिसत असे. ते प्रतिस्पर्धी संघांचा सन्मान करीत. सौरव गांगुलीने हा दृष्टिकोन बदलला. त्याचा भारतात फायदा झाला, पण परदेशात साध्य होत नव्हते. विराट कोहलीस प्रतिआक्रमण पसंत नाही. त्याची पसंती आक्रमकतेस आहे. प्रतिस्पर्ध्यांवर हुकूमत राखण्यासाठी तो आतूर असतो, असे चॅपेल म्हणाले. 

 

कोहली नव्या भारताचे प्रतीक आहे. जागतिक क्रिकेटमध्ये भारत ताकदवान आहे. या देशाचे आपण प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे खेळाची व्याप्ती वाढवण्याची जबाबदारीही तो पार पाडत आहे. भरगच्च क्रिकेट कार्यक्रमात कसोटीचे महत्त्व कोहलीमुळे राहिले आहे. त्यातील कामगिरीसाठी त्याच्यासाठी कायम मोलाची आहे. कसोटीत खेळण्यासाठी त्याने तंदुरुस्तीस महत्त्व दिले. खेळाचा सर्वंकष कस पाहणाऱ्या कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा दबदबा वाढवण्यासाठी तो प्रयत्नशील आहे, असे ते म्हणाले. 

 

भारतातील क्रिकेट प्रशासकांना ट्वेंटी २० या नव्या प्रकाराने आकर्षित केले, पण कोहलीसाठी भारतास जिंकून देणे जास्त महत्त्वाचे आहे. आपला खेळातील दबदबा किती आहे हे तो जाणतो. आणि त्याचा योग्य प्रकारे प्रभाव पाडण्यासाठी उपयोगही करतो. त्याच्यावर असलेला दबावही लक्षात घ्यायला हवा. तो फलंदाजीस जातो, त्यावेळी अब्जावधी लोकांच्या अपेक्षा त्याच्याकडून असतात, असे सांगताना चॅपेल यांनी कोहलीची कारकीर्द घडवण्यात लालचंद राजपूत यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले.

संबंधित बातम्या