साखळी बॅडमिंटन लीगला सुरवात

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

साखळी शटलर्सच्या साखळी बॅडमिंटन लीग स्पर्धेला शुक्रवारपासून सुरवात झाली. स्पर्धेचे उद्‍घाटन सुलक्षणा प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले.

पणजी :  साखळी शटलर्सच्या साखळी बॅडमिंटन लीग स्पर्धेला शुक्रवारपासून सुरवात झाली. स्पर्धेचे उद्‍घाटन सुलक्षणा प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले. सामने साखळी बहुउद्देशीय क्रीडा प्रकल्प सभागृहात खेळले जात आहेत.

खेळामुळे शारीरिक तंदुरुस्ती साधली जाते, तसेच मनोरंजनही होते. खेळात चढाओढ जरुर असावी, त्याचबरोबर प्रत्येकाने  खिलाडूवृत्ती जोपासणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन सुलक्षणा यांनी केले. त्या पुढे म्हणाल्या, की ‘‘कोरोना विषाणू महामारी काळातही अशा स्पर्धेचे आयोजन करण्याचे धाडस केल्याने आयोजक कौतुकास पात्र आहेत. सकारात्मक दृष्टिकोन बाळगून कोरोनासारख्या विषाणूला न घाबरता त्याचा सामना करण्याचे धाडस सर्व जनतेने दाखवले पाहिजे.’’ 

यावेळी डिचोलीचे मामलेदार व साखळी पालिकेचे मुख्याधिकारी प्रवीणजय पंडीत, साखळी शटलर्सचे अध्यक्ष यशवंत देसाई, सभागृह समिती अध्यक्ष दिगंबर उसपकर, सभागृह प्रकल्प प्रमुख राजू पवार यांचीही उपस्थिती होती.  स्पर्धेत भाग घातलेल्या नऊ संघाच्या प्रतिनिधींचे सुलक्षणा सावंत यांच्या हस्ते पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यशवंत देसाई यांनी स्वागत केले. श्याम पेडणेकर यांनी सूत्रसंचालन केले.

संबंधित बातम्या