साखळी बॅडमिंटन लीग उद्यापासून

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

डिचोली आणि सत्तरी तालुक्यातील बॅडमिंटनपटूंना स्पर्धात्मक संधी मिळवून देणारी साखळी बॅडमिंटन लीग (एसबीएल) शुक्रवारपासून (ता. ३०) खेळली जाणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत ऐंशीपेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग असेल.

पणजी : डिचोली आणि सत्तरी तालुक्यातील बॅडमिंटनपटूंना स्पर्धात्मक संधी मिळवून देणारी साखळी बॅडमिंटन लीग (एसबीएल) शुक्रवारपासून (ता. ३०) खेळली जाणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत ऐंशीपेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग असेल.

विशेष बाब म्हणजे, साखळी बॅडमिंटन लीगने २०२० मधील बॅडमिंटन मोसमास अधिकृतपणे सुरवात होईल. स्पर्धेतील अंतिम लढती रविवारी (ता. १) होतील. स्पर्धेचे यंदा पहिलेच वर्ष आहे. सामने साखळी येथील बहुउद्देशीय सभागृहातील बॅडमिंटन कोर्टवर खेळले जातील. साखळी शटलर्स यांच्यातर्फे स्पर्धा घेण्यात येत आहे.

सत्तरी आणि डिचोली तालुक्यातील बॅडमिंटनपटूंना सुरेख संधी प्राप्त होत आहे. या तालुक्यातील खेळाडूंनी हल्लीच्या कालावधीत चांगला खेळ केला आहे. या खेळाडूंना व्यावसायिक धर्तीवर त्यांचे कौशल्य प्रदर्शित करण्यास या स्पर्धेच्या माध्यमातून योग्य व्यासपीठ लाभत आहे, असे गोवा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष नरहर ठाकूर यांनी सांगितले.  
स्पर्धेचे आयोजक साखळी शटलर्स नवोदित असले, तरी अतिशय क्रियाशील आहेत. एसओपी आणि सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी करत महामारीच्या काळात साखळी शटलर्सने गोवा बॅडमिंटन संघटना, तसेच इतर क्लबसाठी आश्वासक मार्ग दाखविला आहे, असे आयोजकांचे कौतुक करताना गोवा बॅडमिंटन संघटनेचे सचिव संदीप हेबळे यांनी सांगितले.

स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी सुलक्षणा सावंत, डिचोलीचे मामलतदार प्रवीणजय पंडित यांच्या उपपस्थितीत होईल. उपांत्य फेरीतील लढती शनिवारी (ता. ३१) होतील, तर अंतिम सामने रविवारी संध्याकाळी खेळले जातील. बक्षीस वितरण समारंभास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष नरहर ठाकूर उपस्थित राहतील. 

नऊ संघांचा सहभाग
स्पर्धेत नऊ संघांचा सहभाग आहे. करण धावसकर, नीलेश परब, सोहन नाईक, रुद्र फडते, आर्यन फातर्पेकर, प्रसाद आजगावर, सिराज वाडकर, अभिषेक स्वामी, ओमकार फुलारी, नोमा सांकवाळकर, मयुश्री आजगावकर, रूपम सांकवाळकर आदी स्पर्धेतील प्रमुख खेळाडू आहेत. खेळाडूंची निवड लिलाव पद्धतीने झाली. 

संबंधित बातम्या