बॅडमिंटनपटू तनिशाचा भर मेहनतीवर

किशोर पेटकर
रविवार, 9 ऑगस्ट 2020

ऑलिंपिक स्पर्धेत भारतासाठी पदकाचे लक्ष्य बाळगलेल्या टार्गेट ऑलिंपिक पोडियम स्किम (टॉप्स) अंतर्गत भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) तनिशा हिची निवड केली आहे.

पणजी

ऑलिंपिक सहभागाचे स्वप्न बाळगलेली गोव्याची प्रतिभाशाली युवा बॅडमिंटनपटू तनिशा क्रास्टो हिने मेहनतीवर भर देत, खेळात आणि अभ्यासतही प्रावीण्य संपादन करण्याचे लक्ष्य बाळगले आहे. 

ऑलिंपिक स्पर्धेत भारतासाठी पदकाचे लक्ष्य बाळगलेल्या टार्गेट ऑलिंपिक पोडियम स्किम (टॉप्स) अंतर्गत भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) तनिशा हिची निवड केली आहे. १२ ऑलिंपिक क्रीडा प्रकारातील २५८ क्रीडापटूंना या योजनेत संधी मिळाली आहे. त्यात तनिशाचा समावेश आहे.

या निवडीनंतर तनिशाने आखातातील प्रसिद्धी माध्यमांशी आपले मनोगत व्यक्त केले. सध्या ती दुबईत आहे. १७ वर्षीय तनिशा तेथील द इंडियन हायस्कूलमध्ये बाराव्या इयत्तेतील विद्यार्थिनी आहे. तनिशाने आगामी जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत खेळण्याचेही ध्येय बाळगले आहे. कोरोना विषाणू महामारीमुळे लांबणीवर पडलेली जागतिक ज्युनियर स्पर्धा पुढील वर्षी ११ ते २४ जानेवारी या कालावधीत नियोजित आहे. या स्पर्धेबरोबरच तनिशाला पुढील वर्षी फेब्रुवारी अखेरीस होणाऱ्या बारावी परीक्षेच्या तयारीवरही लक्ष केंद्रित करायचे आहे. बॅडमिंटनच्या सरावामुळे सध्या अभ्यासासाठी मिळत असलेला थोडाफार वेळ ती सत्कारणी लावत आहे.

तनिशा जागतिक ज्युनियर बॅडमिंटन मानांकनात सध्या मुलींच्या दुहेरीत १९व्या, तर मिश्र दुहेरीत ४५व्या क्रमांकावर आहे. भारतात ती द्वितीय मानांकित ज्युनियर बॅडमिंटनपटू आहे.

तीन सत्रांत सराव

कोरोना विषाणू महामारीमुळे तिने भारतात येण्याऐवजी दुबईतच राहण्यास प्राधान्य दिले आहे.  दुबईजवळील कारामा येथील प्राईम स्टार स्पोर्ट अकादमीत तिचा दररोज तीन सत्रांत सराव सुरू आहे. सकाळी ७ ते ९, नंतर दुपारी १२ ते २ आणि संध्याकाळी ७ ते रात्री ९ अशा तीन सत्रांत ती सराव करते. ती हैदराबादस्थित गोपीचंद बॅडमिंटन अकादमीची प्रशिक्षणार्थी आहे. या अकादमीतील प्रशिक्षकांशी ते वेबिनारच्या माध्यमातून संपर्कात राहते. आठवड्यातून पाच वेळा तनिशा हैदराबादमधील प्रशिक्षकांच्या सत्रात भाग घेते.

संपादन -अवित बगळे

संबंधित बातम्या