सिक्कीममधील नामची मैदानाला बायचुंग भुतियाचे नाव

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020

बायचुंग भुतिया मूळचा सिक्कीममधील आहे. दक्षिण सिक्कीमधील तिन्किताम हे त्याचे जन्मगाव आहे. तेथून २५ किलोमीटरवर असलेल्या नामची येथे फुटबॉल स्टेडियम साकारत आहे. या स्टेडियमला भुतियाचे नाव दिले जाईल, असे सिक्कीम फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष मेन्ला एथेन्पा यांनी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) संकेतस्थळावर जाहीर केले.

पणजी: आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सामन्यांचे शतक नोंदविणारा पहिला भारतीय फुटबॉलपटू बायचुंग भुतिया याच्या नावे सिक्कीममध्ये स्टेडियम प्रत्यक्षात येत आहे. देशात फुटबॉल स्टेडियमला नावे दिले जाणारा तो पहिला फुटबॉलपटू असेल.

बायचुंग भुतिया मूळचा सिक्कीममधील आहे. दक्षिण सिक्कीमधील तिन्किताम हे त्याचे जन्मगाव आहे. तेथून २५ किलोमीटरवर असलेल्या नामची येथे फुटबॉल स्टेडियम साकारत आहे. या स्टेडियमला भुतियाचे नाव दिले जाईल, असे सिक्कीम फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष मेन्ला एथेन्पा यांनी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) संकेतस्थळावर जाहीर केले.

‘‘भारताच्या सर्वोत्तम फुटबॉलपटूस आमची ही मानवंदना आहे. निवृत्तीनंतरही बायचुंग भुतिया कित्येकजणांसाठी आदर्शवत आहे आणि भारतातील युवा फुटबॉलपटूंसाठी प्रेरणास्त्रोत आहे. भारतीय फुटबॉलसाठी त्याने दिलेल्या योगदानाचे आम्ही परतफेड करू शकत नाही, पण त्याचे नाव स्टेडियमला देणे ही या महान फुटबॉलप्रती थोड्याफार प्रमाणात आदरांजली असेल,’’ असे एथेन्पा म्हणाले. भुतिया पद्मश्रीने सन्मानित फुटबॉलपटू आहे.

बायचुंग भुतिया फुटबॉल स्टेडियमच्या कामास २०१० साली सुरवात झाली, मात्र नंतर आर्थिक कारणास्तव काम रखडले. सिक्कीमचे सध्याचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग अधिकारपदावर आल्यानंतर काम पुन्हा सुरू झाले, अशी माहिती सिक्कीम फुटबॉल संघटनेच्या अध्यक्षांनी दिली. स्टेडियम १५ हजार प्रेक्षक क्षमतेचे असेल. सध्या मैदानावर कृत्रिम टर्फ बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. स्टेडियम संकुलात अकादमी सुरू करण्याचेही नियोजन आहे. 

आपल्या नावे राज्यात फुटबॉल स्टेडियम साकारत आहे या भावनेने बायचुंग सुखावला आहे. ‘‘मला अतिशय सन्मानित वाटत असून उत्साहितही झालो आहे,’’ अशी प्रतिक्रिया भुतियाने दिली. ‘‘याकडे मोठ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, उदयोन्मुख फुटबॉलपटूंना फुटबॉल खेळण्यासाठी उच्च दर्जाच्या पायाभूत साधन सुविधा मिळतील याबाबत मी आनंदित आहे. या मैदानाने माझ्यासह कितीतरी फुटबॉलपटू तयार केले आहेत. या ठिकाणी खेळताना माझ्यासाठी कितीतरी स्मृती आहेत,’’ असे भुतिया म्हणाला. या ठिकाणी अकादमी सुरू करण्याविषयी आम्ही राज्य सरकारशी चर्चा केली आहे. सिक्कीम सरकार व युनायटेड सिक्कीम क्लब यांच्या संयुक्त उपक्रमातून या भागातील युवा खेळाडूंना फुटबॉल खेळण्याचे व्यासपीठ लाभत आहे, या ठिकाणी गोल्डन बेबी लीग स्पर्धा घेण्याचेही नियोजन असल्याची माहिती भुतियाने दिली.

बायचुंग भुतिया याच्याविषयी...
बायचुंग भुतिया ४३ वर्षांचा असून १० मार्च १९९५ रोजी १८ वर्षे २ महिने आणि २३ वर्षांचा असताना त्याने भारताच्या सीनियर संघातून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले. १८ जानेवारी २०११ रोजी तो शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. या कालावधीत त्याने भारतीय संघाचे नेतृत्वही केले. या आघाडीपटूने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये १०४ सामन्यांत ४० गोल नोंदविले आहेत.  

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या