आयएसएलमध्ये बंगळूर सलग दुसऱ्या लढतीत विजयापासून दूर ; कालच्या सामन्यात हैदराबादशी बचावात्मक बरोबरी

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

माजी विजेत्या बंगळूर एफसीचा हरपलेला सूर, हैदराबाद एफसीच्या दोघा प्रमुख खेळाडूंच्या पूर्वार्धातील दुखापती या पार्श्वभूमीवर इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत काल उभय संघांतील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला.

पणजी  : माजी विजेत्या बंगळूर एफसीचा हरपलेला सूर, हैदराबाद एफसीच्या दोघा प्रमुख खेळाडूंच्या पूर्वार्धातील दुखापती या पार्श्वभूमीवर इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत काल उभय संघांतील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला.

सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेला सामना रंगतदार ठरू शकला नाही, बचावात्मक धोरणच दिसले. कार्ल्स कुआद्रात यांच्या मार्गदर्शनाखालील बंगळूरला सलग दुसऱ्या लढतीत विजयापासून दूर राहावे लागले. पहिल्या लढतीत त्यांना एफसी गोवाने 2-2 गोलबरोबरीत रोखले होते. दोन लढतीनंतर बंगळूरच्या खाती आता दोन गुण आहेत. मान्युएल मार्किझ यांच्या मार्गदर्शनाखालील हैदराबादने आजच्या एका गुणासह दोन लढतीनंतर एकूण गुणसंख्या चारवर नेली. पहिल्या लढतीत त्यांनी ओडिशा एफसीला एका गोलने हरविले होते.

हैदराबाद एफसीने सामन्याच्या पूर्वार्धात लक्षवेधक खेळ केला, पण त्यांना नशिबाची साथ लाभली नाही. दोघा प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीचा फटकाही त्यांना सहन करावा लागला. 35व्या मिनिटास ऑस्ट्रेलियन आघाडीपटू जोएल चियानेज याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. त्याची जागा महंमद यासीर याने घेतली. त्यानंतर विश्रांतीपूर्वी स्पॅनिश मध्यरक्षक लुईस सास्त्रे जायबंदी झाला, त्याची जागा हितेश शर्मा याने घेतली.

सामन्याच्या 24व्या मिनिटास हैदराबादचा स्पॅनिश आघाडीपटू आरिदाने सांताना याने जवळपास संघाला आघाडी मिळवून दिली होती, पण बंगळूरचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याच्या चपळ हालचालीमुळे गोलशून्य बरोबरीची कोडी कायम राहिली. सेटपिसेसवर सांताना याचा हेडर भेदक होता, पण संधू दक्ष राहिल्याने हैदराबादला खाते उघडता आले नाही.

सामन्यातील अकरा मिनिटे बाकी असताना बंगळूरला आघाडीची संधी होती, परंतु त्यांच्या क्लेटन सिल्वा याचा प्रयत्न हैदराबादच्या बचावपटूने यशस्वी होऊ दिला नाही. त्यानंतर सामन्याच्या शेवटच्या मिनिटास पुन्हा सिल्वा हैदराबादचा बचाव भेदू शकला नाही. बंगळूरचा प्रमुख खेळाडू सुनील छेत्रीचा खेळ आज निस्तेज ठरला. तुलनेत हैदराबादने गोलच्या दिशेने जास्त फटके मारले.

 

दृष्टिक्षेपात...

- हैदराबाद व बंगळूर यांच्यात आयएसएलमध्ये दुसरी बरोबरी

- गतमोसमात हैदराबाद व बंगळूर यांच्यात हैदराबादमधील सामना 1-1 बरोबरीत

- उभय संघातील 3 लढतीत 2 बरोबरी, बंगळूरचा 1 विजय

- प्रत्येकी 2 लढतीनंतर हैदराबादचे 4, बंगळूरचे 2 गुण

- सामन्यात हैदराबादचे 433, तर बंगळूरचे 418 पास

 
 

संबंधित बातम्या