ISL : तब्बल आठ लढतीनंतर बंगळूरचा विजयासाठी वनवास संपुष्टात

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

सामन्याच्या पूर्वार्धात झालेल्या दोन गोलमुळे बंगळूर एफसीचा सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील विजयासाठीचा वनवास अखेर मंगळवारी संपुष्टात आला.

पणजी : सामन्याच्या पूर्वार्धात झालेल्या दोन गोलमुळे बंगळूर एफसीचा सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील विजयासाठीचा वनवास अखेर मंगळवारी संपुष्टात आला. ईस्ट बंगालला त्यांनी 2-0 फरकाने हरवून आठ लढतीनंतर विजयी जल्लोष केला.

सामना मंगळवारी वास्को येथील टिळक मैदानावर झाला. ब्राझालीयन मध्यरक्षक क्लेटन सिल्वा याच्या हाफ व्हॉली फटक्यावरील गोलमुळे बंगळूर एफसीने 12व्या मिनिटास आघाडी घेतली. गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधूच्या फ्रीकिकवरील सुनील छेत्रीच्या असिस्टवर हा गोल झाला. ईस्ट बंगालच्या डॅनियल फॉक्स याच्याशी झालेल्या बाचाबाचीच्या पार्श्वभूमीवर सिल्वासाठी या गोलचा आगळा ठरला.  

पूर्वार्धातील शेवटच्या मिनिटास बंगळूरचा बदली खेळाडू पारस श्रीवास याचा फटका गोलपोस्टला आपटून ईस्ट बंगालचा गोलरक्षक देबजित मजुमदार याच्या पायाला लागून नेटमध्ये गेल्याने स्वयंगोलसह बंगळूरच्या खाती दुसऱ्या गोलची नोंद झाली. तीन मिनिटांपूर्वीच पारस मैदानावर उतरला होता.

प्रोफेशनल लीग फुटबॉलमध्ये चर्चिल ब्रदर्सचा 5 - 0 फरकाने धुव्वा

स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात फातोर्डा येथे ईस्ट बंगालकडून एका गोलच्या फरकाने पत्कराव्या लागलेल्या पराभवाची परतफेड मंगळवारी बंगळूरने केली. मुख्य अंतरिम प्रशिक्षक नौशाद मूसा यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विजेत्यांनी प्रथमच पूर्ण तीन गुणांची कमाई केली.

आयएसएल स्पर्धेच्या सातव्या मोसमात सगल आठ सामने विजयाविना राहिल्यानंतर बंगळूर एफसीने पहिलाच विजय नोंदविला. तीन बरोबरी व पाच पराभवानंतर विजय साकारताना त्यांनी एकंदरीत 15 लढतीत चौथा सामना जिंकला, त्यामुळे त्यांचे आता 18 गुण झाले असून सहाव्या स्थानी प्रगती साधली आहे. बंगळूरने शेवटचा विजय 17 डिसेंबर 2020 रोजी बांबोळी येथे ओडिशाविरुद्ध (2-1) नोंदविला होता.

एफसी गोवाविरुद्ध मागील लढतीत आक्रमक खेळ केलेल्या रॉबी फावलर यांच्या मार्गदर्शनाखालील ईस्ट बंगालला सूर गवसला नाही. त्यांचा हा 15 लढतीतील सहावा पराभव ठरला. त्यांचे 13 गुण आणि दहावा क्रमांक कायम राहिला.

दृष्टिक्षेपात...

- ब्राझीलियन 33 वर्षीय मध्यरक्षक क्लेटन सिल्वा याचे 15 आयएसएल लढतीत 5 गोल

- बंगळूरचा कर्णधार सुनील छेत्री याचे 89 आयएसएल सामन्यात 9 असिस्ट

- बंगळूरची 11 सामन्यानंतर क्लीन शीट, एकंदरीत मोसमात 3

- बंगळूर एफसीचे मोसमात 19 गोल

- ईस्ट बंगालवर प्रतिस्पर्ध्यांचे मोसमात 20 गोल
 

संबंधित बातम्या