ISL 2020-21 : दमदार बंगळूरचा मुंबई सिटीस धक्का

दैनिक गोमन्तक
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

ब्राझीलियन क्लेटन सिल्वा आणि कर्णधार सुनील छेत्री यांच्या प्रत्येकी दोन गोलच्या बळावर बंगळूर एफसीने सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील रंगतदार लढतीत मुंबई सिटीस 4 - 2 फरकाने पराभवाचा धक्का दिला.

पणजी : ब्राझीलियन क्लेटन सिल्वा आणि कर्णधार सुनील छेत्री यांच्या प्रत्येकी दोन गोलच्या बळावर बंगळूर एफसीने सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील रंगतदार लढतीत मुंबई सिटीस 4 - 2 फरकाने पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघाची पुन्हा अग्रस्थान मिळविण्याची संधी हुकली.

सामना सोमवारी बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर झाला. बंगळूर एफसीसाठी ब्राझीलियन मध्यरक्षक क्लेटन सिल्वा याने अनुक्रमे पहिल्या (25 सेकंद) आणि 22 व्या मिनिटास अचूक नेम साधला. अनुभवी स्ट्रायकर कर्णधार सुनील छेत्री याने बंगळूरतर्फे दोनशेव्या सामन्यात खेळताना 57 व्या मिनिटास लक्ष्य साधले. छेत्रीनेच प्रतिहल्ल्यावर जोरदार मुसंडी मारत 90+3 व्या मिनिटास बंगळूरच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल केला.

INDvsENG : अश्विनच्या नावावर झाला अनोखा रेकॉर्ड; दिग्गज क्रिकेटपटूंना सोडले...

मुंबई सिटीचे दोन्ही गोल इंग्लिश आघाडीपटू एडम ली फाँड्र याने केले. त्याने अनुक्रमे 57 व 72 व्या मिनिटास चेंडूला अचूक दिशा दाखविली. आजच्या विजयाने बंगळूरने पहिल्या टप्प्यात मुंबई सिटीकडून पत्कराव्या लागलेल्या पराभवाचा वचपा काढला.

अंतरिम प्रशिक्षक नौशाद मुसा यांच्या मार्गदर्शनाखालील बंगळूर एफसीचा हा 18 लढतीतील पाचवा विजय ठरला. त्यांचे आता 22 गुण झाले असून प्ले-ऑफ फेरीच्या आशाही कायम राहिल्या आहेत. एफसी गोवा आणि हैदराबाद एफसी यांच्यापेक्षा त्यांचे दोन गुण कमी आहेत. बंगळूरने आता सहावा क्रमांक मिळविला आहे. मुंबई सिटीस तिसरा पराभव पत्करावा लागला. त्यांचे आता 17 सामन्यांतून 34 गुण व दुसरा क्रम कायम राहिला. अव्वल स्थानावरील एटीके मोहन बागानचे सर्वाधिक 36 गुण आहेत.

22 मिनिटांत 2 गोल

सामन्याच्या सुरवातीच्या २२ मिनिटांत ब्राझीलियन मध्यरक्षक क्लेटन सिल्वा याने दोन गोल नोंदवून बंगळूरला भक्कम स्थिती गाठून दिली. पहिला गोल २५व्या सेकंदास झाला. यंदाच्या स्पर्धेतील हा वेगवान गोल ठरला. बंगळूरने मुंबई सिटीच्या गोलक्षेत्रात जोरदार आक्रमण केल्यानंतर उदांता सिंगच्या असिस्टवर क्लेटनने मुंबई सिटीचा गोलरक्षक अमरिंदर सिंगला चकवा दिला. दुसरा गोल सेटपिसेसवर झाला. झिस्को हर्नांडेझच्या फ्रीकिकवर क्लेटनचे हेडिंग भेदक ठरले.

रंगतदार उत्तरार्ध

दोन गोलच्या पिछाडीनंतर मुंबई सिटीने उत्तरार्धात जोरदार प्रत्त्युतर दिले. इंग्लिश आघाडीपटू एडम ली फाँड्र याच्या दोन गोलमुळे मुंबई सिटीस पिछाडी कमी करता आली. जपानी खेळाडू साय गॉडार्ड याच्या असिस्टवर दोन्ही गोल झाले. मैदानाच्या उजव्या बाजूतून गॉडार्ड याने जोरदार मुसंडी मारली आणि फ्राँड्र याला सुरेख क्रॉसपास दिला. यावेळी बचावपटू हरमनज्योत खब्रा याची शिथिलता बंगळूरला महागात पडली. त्यानंतर सामन्यातील अठरा मिनिटे बाकी असताना फाँड्र याने गॉडार्ड याच्याकडून उंचावरून मिळालेल्या चेंडूस शानदार हेडिंगद्वारे नेटची दिशा दाखविली. त्यापूर्वी, अनुभवी स्ट्रायकर सुनील छेत्री याने बंगळूरच्या खाती तिसऱ्या गोलची भर टाकली होती. गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधूच्या सणसणीत गोल किकवर मुंबई सिटीच्या अहमद जाहू याला चकवा देत छेत्रीने जागा सोडलेला प्रतिस्पर्धी गोलरक्षक अमरिंदरच्या दोन्ही पायामधून चेंडूला नेटची दिशा दाखविली.

दृष्टिक्षेपात...

-बंगळूरच्या क्लेटन सिल्वाचा 25व्या सेकंदास गोल, यंदाच्या स्पर्धेत वेगवान

- यापूर्वी चेन्नईयीन एफसीच्या अनिरुद्ध थापाचा वास्को येथे जमशेदपूरविरुद्ध 47व्या सेकंदास गोल

- बंगळूरचा ब्राझीलियन क्लेटन सिल्वा याचे 17 सामन्यांत 7 गोल

- बंगळूरतर्फे सर्व प्रकारच्या फुटबॉलमध्ये सुनील छेत्रीचे 200 सामने

- सुनील छेत्रीचे 18 सामन्यांत 7 गोल, तर आयएसएलमधील 92 सामन्यांत एकूण 46 गोल

- मुंबई सिटीचा इंग्लिश खेळाडू एडम ली फाँड्र याचे 17 सामन्यांत 11 गोल

- पहिल्या टप्प्यात मुंबई सिटीचा बंगळूरवर 3-1 फरकाने विजय
 

संबंधित बातम्या