'आयएसएल'च्या सदर्न डर्बीत बंगळूर एफसीची केरळा ब्लास्टर्सवर मात

'आयएसएल'च्या सदर्न डर्बीत बंगळूर एफसीची केरळा ब्लास्टर्सवर मात

फातोर्डा :   रंगतदार ठरलेल्या सदर्न डर्बीत उत्तरार्धात बंगळूर एफसीने प्रेक्षणीय गोलधडाका राखत केरळा ब्लास्टर्सला पिछाडीवरून 4-2 फरकाने हरविले. इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात एका सामन्यात प्रथमच सर्वाधिक (6) गोल झाले. सामना काल फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. बंगळूर एफसीसाठी ब्राझीलियन क्लेटन सिल्वा (29वे मिनिट), ऑस्ट्रेलियन एरिक पार्तालू (51वे मिनिट), स्पॅनिश दिमास डेल्गाडो (53वे मिनिट) व 48व्या मिनिटास पेनल्टी फटका गोलरक्षकाच्या हाती मारलेला कर्णधार सुनील छेत्री (65वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला. केरळा ब्लास्टर्सला 17व्या मिनिटास वीस वर्षीय राहुल केपी याने आघाडी मिळवून दिली होती, त्यांच्यासाठी अन्य एक गोल ऑस्ट्रेलियन जॉर्डन मरे (61वे मिनिट) याने नोंदविला.

बंगळूरचा हा पाच लढतीतील दुसरा विजय ठरला. अपराजित असलेल्या या संघाचे आता अन्य तीन बरोबरीसह नऊ गुण झाले आहे. ते आता चौथ्या स्थानी आले आहेत. विजयाविना असलेल्या केरळा ब्लास्टर्सला तिसरा पराभव पत्करावा लागला. अन्य दोन बरोबरीमुळे त्यांचे पाच लढतीतून फक्त दोन गुण आहेत. ते नवव्या क्रमांकावर कायम आहेत. सामन्याच्या पूर्वार्धात 1-1 गोलबरोबरी राहिली. मध्यरक्षक राहुल केपी याने केरळा ब्लास्टर्सला आघाडी मिळवून दिली. गॅरी हूपरच्या शानदार चालीवर राहुलने ताकदवान फटक्यावर गोल नोंदविला. मात्र बारा मिनिटानंतर ब्राझीलियन क्लेटन सिल्वा याच्या गोलमुळे माजी विजेत्यांनी बरोबरी साधली. लालरुआथारा याच्या असिस्टवर क्लेटनने चेंडूला नेटची दिशा दाखविली.

सामन्याच्या उत्तरार्धाची सुरवात नाट्यमय ठरली. विश्रांतीनंतरच्या तिसऱ्याच मिनिटास कर्णधार सुनील छेत्रीने पेनल्टी फटका थेट केरळाचा गोलरक्षक आल्बिनो गोम्सच्या हाती मारला. ही चूक बंगळूरला महागात पडली नाही. दोन मिनिटांत दोन गोल नोंदवत कार्ल्स कुआद्रात यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने 3-1 अशी दमदार आघाडी प्राप्त केली. एरिक पार्तालू व दिमास डेल्गाडो यांनी झटपट गोल नोंदवत बंगळूरची बाजू मजबूत केली. तासाभराच्या खेळानंतर ऑस्ट्रेलियन जॉर्डन मरे याने केरळाची पिछाडी एका गोलने कमी केली. लगेच चार मिनिटांनंतर सुनील छेत्रीने मागील चुकीची भरपाई करताना हरमनज्योत खबरा याच्या असिस्टवर भेदक हेडिंग साधले.

दृष्टिक्षेपात...

- केरळा ब्लास्टर्सच्या राहुल केपी याचे 11 आयएसएल सामन्यात 2 गोल, यंदा पहिलाच

- यंदाच्या आयएसएलमध्ये बंगळूरच्या क्लेटन सिल्वाचे 2 गोल

- एरिक पार्तालूचा यंदा पहिला गोल, एकंदरीत 59 आयएसएल लढतीत 4 गोल

- दिमास डेल्गाडोचे 59 आयएसएल लढतीत 4 गोल, यंदा पहिलाच

- सुनील छेत्रीचा यंदाच्या स्पर्धेत 2, तर 79 आयएसएल लढतीत 41 गोल

- जॉर्डन मरे याला पहिलाच आयएसएल गोल

- बंगळूरचे केरळा ब्लास्टर्सवर 7 लढतीत 5 विजय

- बंगळूरचे यंदाच्या मोसमात सर्वाधिक 9 गोल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com