'आयएसएल'मध्ये विक्रम करत 'सुनील छेत्री'ने 'ओडिशा'ला नमवले

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020

कर्णधार सुनील छेत्री आणि क्लेटन सिल्वा यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी एका गोलच्या बळावर बंगळूर एफसीने काल इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत विजयी कामगिरी नोंदविली.

पणजी :  कर्णधार सुनील छेत्री आणि क्लेटन सिल्वा यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी एका गोलच्या बळावर बंगळूर एफसीने काल इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत विजयी कामगिरी नोंदविली. संघर्ष करणाऱ्या ओडिशा एफसीला त्यांनी 2-1 फरकाने हरविले. स्पर्धेत 50 गोलमध्ये वाटा उचलणारा पहिला भारतीय हा मान छेत्रीने पटकाविला. सामना बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवप झाला. बंगळूरसाठी कर्णधार सुनील छेत्रीने 38व्या, तर ब्राझीलियन क्लेटन सिल्वा याने 79व्या मिनिटास गोल केला. ओडिशातर्फे स्टिवन टेलर याने 71व्या मिनिटास गोल नोंदविला. बंगळूरचा हा सहा लढतीतील तिसरा विजय ठरला. त्यांचे आता 12 गुण झाले असून ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. ओडिशाची निराशा कायम राहिली. सहा लढतीत त्यांना पाचवा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे फक्त एका गुणासह हा संघ दहाव्या क्रमांकावर आहे. ते अजूनही विजयाविना आहेत.

 

विश्रांतीला सात मिनिटे बाकी असताना सुनील छेत्रीचा हेडर भेदक ठरला आणि बंगळूरच्या खाती आघाडी जमा झाली. दिमास डेल्गाडो याने सुरवात केल्यानंतर हरमज्योत खबरा याने उजव्या बाजूने चेंडूवर ताबा मिळविला. त्यानंतर गोलक्षेत्रात खबरा याने छेत्रीच्या दिशेने सुरेख पास केला. बंगळूरच्या कर्णधाराने आपला मार्कर शुभम सारंगी याच्यापेक्षा उंच झेप घेत छान हेडिंग साधत बंगळूरचा सामन्यातील पहिला गोल नोंदविला. सामन्याच्या 71व्या मिनिटास इंग्लिश बचावपटू स्टिवन टेलर याच्या गोलमुळे ओडिशाने गोलबरोबरी साधली. जेरी माविमिंगथांगा याच्या असिस्टवर गोलक्षेत्रात चेंडू नियंत्रित करत टेलर याने गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याचा बचाव भेदला. मात्र आठ मिनिटानंतर बंगळूरने पुन्हा आघाडी संपादली. एक मिनिटापूर्वी मैदानात आलेला बदली खेळाडू देशॉर्न ब्राऊन याच्या असिस्टवर सिल्वाने गोलक्षेत्रातून अगदी जवळून चेंडूला नेटची दिशा दाखविली. त्यापूर्वी सामन्याच्या 21व्या मिनिटास बंगळूरला आघाडी घेण्याची सोपी संधी होती, पण आशिक कुरुनियान अचूक फटका मारू शकला नाही. ओडिशाच्या मान्यूएल ओन्वू याचा गोल लाईनमनने अवैध ठरविल्यामुळे बंगळूरचे नुकसान झाले नाही. 68व्या मिनिटाल बंगळूरला आघाडी वाढविण्याची संधी होती. एरिक पार्तालूचा प्रयत्न ओडिशाचा गोलरक्षक अर्शदीप सिंग याने दक्ष राहत रोखून धरला.

 

सुनील छेत्रीचे अर्धशतक!

बंगळूरच्या कर्णधार सुनील छेत्री याने गुरुवारी आयएसएल स्पर्धेत आगळे अर्धशतक नोंदविले. 42 गोल आणि 8 असिस्ट मिळून आयएसएलमध्ये 50 गोलमध्ये योगदान देण्याचा पराक्रम या ३६ वर्षीय आघाडीपटूने बजावला आहे. 2015 पासून आयएसएलमध्ये छेत्री 80 सामने खेळला आहे. यंदाच्या आयएसएलमध्ये त्याने 3 वेळा चेंडूला नेटची दिशा दाखविली आहे.

 

दृष्टिक्षेपात...

- बंगळूरच्या सुनील छेत्री याचे यंदा 3, आयएसएलमध्ये एकूण 42 गोल

- ओडिशाच्या स्टीवन टेलर याचा आयएसएलमध्ये पहिलाच गोल

- 3 सामन्यानंतर ओडिशा एफसीचा प्रथमच गोल

- बंगळूरच्या क्लेटन सिल्वा याचे आता आयएसएलमध्ये 3 गोल

 
 

संबंधित बातम्या