बंगळूरला एका गुणाचे समाधान सलग चार पराभनवानंतर नॉर्थईस्टला बरोबरीत रोखले

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 13 जानेवारी 2021

 माजी विजेत्या बंगळूर एफसीला सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सलग चार पराभवानंतर मंगळवारी एका गुणाचे समाधान लाभले. राहुल भेकेच्या उत्तरार्धातील गोलमुळे त्यांनी नॉर्थईस्ट युनायटेडला 1-1 असे गोलबरोबरीत रोखले.

पणजी : माजी विजेत्या बंगळूर एफसीला सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सलग चार पराभवानंतर मंगळवारी एका गुणाचे समाधान लाभले. राहुल भेकेच्या उत्तरार्धातील गोलमुळे त्यांनी नॉर्थईस्ट युनायटेडला 1-1 असे गोलबरोबरीत रोखले.

सामना मंगळवारी वास्को येथील टिळक मैदानावर झाला. नॉर्थईस्ट युनायटेडला पोर्तुगीज स्ट्रायकर लुईस माशादो याने 27व्या मिनिटास आघाडी मिळवून दिली, त्यानंतर 49व्या मिनिटास बचावपटू राहुल भेके याच्या गोलमुळे बंगळूरने बरोबरी साधली. उभय संघातील पहिल्या टप्प्यातील सामनाही गोलबरोबरीत (2-2) राहिला होता.

बंगळूरची ही चौथा बरोबरी ठरली. 11 लढतीनंतर त्यांचे आता 13 गुण झाले आहेत. अंतरिम प्रशिक्षक नौशाद मूसा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा हा पहिलाच गुण ठरला. बंगळूरचे सहावे स्थान कायम आहे. अगोदरचे दोन्ही सामने गमावलेल्या गुवाहाटीच्या नॉर्थईस्टची ही सहावी बरोबरी ठरली. त्यांचे 11 लढतीनंतर 12 गुण झाले असून सातवा क्रमांक कायम राहिला.

पोर्तुगीज आघाडीपटू लुईस माशादो याने केलेल्या गोलमुळे पूर्वार्धात नॉर्थईस्ट युनायटेडला आघाडी प्राप्त झाली. उरुग्वेच्या मध्यरक्षक फेडेरिको गेलेगो याने चेंडूवर ताबा राखत बंगळूरच्या बचावफळीस छेद देण्याचे काम बजावले, त्याच्या फटक्याचा नेम चुकला, पण त्याचवेळी चेंडूवर ताबा राखत माशादो याने बंगळूरचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याला फटका अडविण्याची संधी दिली नाही. बंगळूरविरुद्ध माशादो याचा हा तिसरा गोल ठरला. पहिल्या टप्प्यातील बरोबरीतही त्यानेच दोन्ही गोल केले होते.

विश्रांतीनंतर लगेच नॉर्थईस्टचा गोलरक्षक गुरमीत सिंग याची चूक बंगळूरच्या पथ्यावर पडली, त्यामुळे माजी विजेत्यांना बरोबरी साधता आली. दिमास देल्गाडोच्या असिस्टवर बचावपटू राहुल भेके याच्या डाव्या पायाच्या फटक्यासमोर गोलरक्षक गुरमीत एकाग्रता गमावून बसला, त्याचा अंदाज चुकला आणि बंगळूरने पिछाडी भरून काढली. शानदार नेम साधलेल्या तीस वर्षीय राहुलचा हा मोसमातील पहिलाच गोल ठरला.

पूर्वार्धातील खेळातील इंज्युरी टाईममध्ये ब्राझीलियन क्लेटन सिल्वा याने अचूक हेडिंग साधले असते, तर कदाचित बंगळूरच्या खाती आणखी एक गोल जमा झाला असता, पण सिल्वाचा कमजोर हेडर गोलरक्षक गुरमीतसाठी भारी ठरू शकला नाही.

 

दृष्टिक्षेपात...

- नॉर्थईस्ट युनायटेडचा पोर्तुगीज स्ट्रायकर लुईस माशादो याचे यंदाच्या आयएसएलमधील 11 सामन्यात 3 गोल, सर्व गोल बंगळूरविरुद्ध

- बचावपटू राहुल भेके याचा मोसमातील पहिलाच, तर 86 आयएसएल सामन्यात 5 गोल

- बंगळूरचे मोसमात उत्तरार्धातील खेळात 9 गोल

- नॉर्थईस्ट युनायटेड सलग 7 सामने विजयाविना, 4 बरोबरी 3 पराभव

- नॉर्थईस्ट युनायटेडच्या मोसमात सर्वाधिक 6 बरोबरी
 

संबंधित बातम्या