चेन्नईयीनला नमवून यंदाच्या आयएसएल मोसमात 'बंगळूर एफसी'च्या खात्यात प्रथमच पूर्ण गुण

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 5 डिसेंबर 2020

कर्णधार सुनील छेत्रीने शांतचित्ताने नोंदविलेल्या पेनल्टी गोलमुळे माजी विजेत्या बंगळूर एफसीने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात प्रथमच पूर्ण तीन गुणांची कमाई केली.

पणजी :  कर्णधार सुनील छेत्रीने शांतचित्ताने नोंदविलेल्या पेनल्टी गोलमुळे माजी विजेत्या बंगळूर एफसीने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात प्रथमच पूर्ण तीन गुणांची कमाई केली. त्यांनी दोन वेळच्या विजेत्या चेन्नईयीन एफसीला 1-0 फरकाने निसटते हरविले.

 

बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर काल झालेल्या चुरशीच्या सदर्न डर्बी लढतीत छेत्रीने 56व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर अचूक लक्ष्य साधले. बंगळूरचे आता तीन लढतीतून एक विजय आणि दोन बरोबरीसह पाच गुण झाले आहेत. चेन्नईयीनला पहिला पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे तीन लढतीनंतर त्यांचे चार गुण कायम राहिले. अगोदरच्या लढतीत त्यांनी प्रत्येकी एक विजय आणि बरोबरीची नोंद केली होती.

 

विश्रांतीनंतरच्या अकराव्या मिनिटास सुनील छेत्रीने यंदाच्या आयएसएलमधील वैयक्तिक पहिला गोल नोंदविताना पेनल्टी फटका सत्कारणी लावला. त्यामुळे बंगळूरला एका गोलची आघाडी घेणे शक्य झाले. चेन्नईयीन एफसीच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारलेल्या बंगळूरच्या क्लेटन सिल्वा याच्याकडून चेंडू हिरावून घेण्याच्या प्रयत्नात एडविन व्हॅन्सपॉल याने प्रतिस्पर्धी खेळाडूस पाडण्याची चूक केली. रेफरी राहुलकुमार गुप्ता यांनी थेट पेनल्टी फटक्याची खूण केली. यावेळी भारतीय संघाच्या कर्णधाराने शांतपणे फटका मारताना गोलरक्षक विशाल कैथ याला पूर्णपणे चकविले. गोलरक्षक उजव्या बाजूने झेपावला, पण चेंडू रोखण्यापूर्वीच वेगवान फटका गोलमध्ये रुपांतरीत झाला.

 

 

आघाडीनंतर चार मिनिटांनी सेटपिसेसवर दिमास देल्गादो याचा फटका गोलरक्षक कैथ याने पूर्णपणे झोकून घेत अडविल्यामुळे बंगळूरची आघाडी एका गोलपुरती मर्यादित राहिली. 79व्या मिनिटास चेन्नईयीनला बरोबरीची संधी होती. लाल्लियानझुआला छांगटे याच्या असिस्टवर फात्खुल्लो फात्खुलोएव याच्या फटक्याची दिशा चुकल्यामुळे चेन्नईच्या संघाला बरोबरीपासून दूर राहावे लागेल. इंज्युरी टाईममध्ये याकुब सिल्व्हेस्टर याचा सणसणीत फटका गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याने वेळीच रोखल्यामुळे बंगळूरची एका गोलची आघाडी अबाधित राहिली.

 

अनिरुद्धला दुखापत

चेन्नईयीनचे नियोजन आज प्रारंभीच विस्कळित झाले. मध्यफळीतील त्यांचा हुकमी खेळाडू अनिरुद्ध थापा याला पायाच्या दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले, त्यामुळे प्रशिक्षक साबा लाझ्लो यांना एडविन व्हॅन्सपॉल याला संधी द्यावी लागली. अनिरुद्धच्या अनुपस्थितीत चेन्नईयीनच्या आक्रमणावर मर्यादा आल्या. पूर्वार्धात दोन्ही संघांच्या बचावफळीने दक्ष कामगिरी निभावली. त्यामुळे गोलशून्य बरोबरीची कोंडी फुटू शकली नाही.

 

दृष्टिक्षेपात

- सातव्या आयएसएल स्पर्धेत सुनील छेत्रीकडून 3 लढतीत 1 गोल

- बंगळूरच्या कर्णधाराचे आता आयएसएलमधील 77 लढतीत एकूण 40 गोल

- भारतीयांतर्फे सुनील छेत्रीचे आयएसएलमध्ये सर्वाधिक गोल, गतमोसमात 9 गोल

- आयएसएलमधील 8 लढतीत बंगळूरचे 4 विजय, चेन्नईयीन 3 लढतीत विजयी, 1 बरोबरी

- लढतीत बंगळूरचे 415, तर चेन्नईयीनचे 358 पास

 

अधिक वाचा :

रशियात जिंकलेल्या ऑलिंपियाड सुवर्णपदकासाठी बुद्धिबळपटूंना भरावे लागले सीमाशुल्क

 

 

संबंधित बातम्या