गोल नोंदविण्यात संघर्ष करणाऱ्या ओडिशासमोर आज लढत बंगळूरचे आव्हान

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 16 डिसेंबर 2020

बंगळूर एफसी सध्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत अपराजित आहे, तसेच नऊ गोल नोंदवून आक्रमक शैली प्रदर्शित केली आहे. गोल नोंदविण्यासाठी संघर्ष करणाऱ्या तळाच्या ओडिशा एफसीविरुद्धही धडाका कायम राखण्याचे त्यांचे ध्येय असेल.

पणजी- बंगळूर एफसी सध्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत अपराजित आहे, तसेच नऊ गोल नोंदवून आक्रमक शैली प्रदर्शित केली आहे. गोल नोंदविण्यासाठी संघर्ष करणाऱ्या तळाच्या ओडिशा एफसीविरुद्धही धडाका कायम राखण्याचे त्यांचे ध्येय असेल. सामना गुरुवारी (ता. 17) बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर होईल.

‘‘मी माझ्या खेळाडूंना ओळखतो, ते आत्मसंतुष्ट नाहीत, ते निश्चितच तीन गुणांसह प्रयत्न करतील,’’ असे सांगत बंगळूर एफसीचे प्रशिक्षक कार्ल्स कुआद्रात यांनी गुरुवारच्या लढतीपूर्वी आपला संघ सज्ज असल्याचे स्पष्ट केले. बंगळूरने मागील लढतीत केरळा ब्लास्टर्सला 4-2 फरकाने हरविले होते. क्लेटन सिल्वा, सुनील छेत्री, एरिका पार्तालू, दिमास डेलगाडो या प्रमुख खेळाडूंनी त्या लढतीत गोल केले. याशिवाय ज्युआनन व उदांता सिंग यांनीही यापूर्वीच्या लढतीत गोल केले आहेत. साहजिकच ओडिशा एफसीला खूपच सावध राहावे लागेल. कुआद्रात यांनी ओडिशाला कमी लेखलेले नाही. ओडिशासारखे संघ खूप धोकादायक असतात याची जाणीव आम्हाला आहे, असे त्यांनी नमूद केले. बंगळूरचे पाच लढतीतून नऊ गुण असून त्यांनी दोन विजय व तीन बरोबरीची नोंद केलेली आहे. 

ओडिशाच्या खाती पाच लढतीनंतर फक्त एक गुण असून ते दहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांनी फक्त दोन गोल नोंदविले असून सात गोल स्वीकारले आहेत. ओडिशाने तीन गोल पेनल्टीवर, तर एक गोल फ्रीकिकवर स्वीकारला आहे, त्यामुळे बंगळूरच्या सेटपिसेस आक्रमणासमोर ओडिशाला परीक्षा द्यावी लागेल. एकंदरीत कामगिरी पाहता, बंगळूरविरुद्ध ओडिशासमोर खडतर आव्हान असेल. प्रशिक्षक स्टुअर्ट बॅक्स्टर यांना याची जाणीव आहे. ‘‘चेंडूवरील ताबा लक्षात घेता, आक्रमणात आम्ही अधिक तरबेज असणे आवश्यक आहे,’’ असे मत बॅक्स्टर यांनी व्यक्त केले. 
ओडिशाने प्रत्येक सामन्यात गोल स्वीकारला आहे, तरीही काही सामन्यात आपल्या संघाने चांगला बचाव केल्याचे प्रशिक्षकाचे म्हणणे आहे.

दृष्टिक्षेपात

 गतमोसमात बंगळूरचे ओडिशावर 2 विजय

पुणे येथे 1-0, तर बंगळूर येथे 3-0 फरकाने विजयी

ओडिशा एफसी मागील 3 लढतीत गोलविना आणि पराभूत

आयएसएलच्या सातव्या मोसमात बंगळूरचे मुंबई सिटीइतकेच 9 गोल

बंगळूरच्या क्लेटन सिल्वा, ज्युआनन, सुनील छेत्री यांचे प्रत्येकी 2 गोल

ओडिशाचे स्पर्धेत 2 गोल, दोन्ही दिएगो मॉरिसियोचे

 

संबंधित बातम्या