लिओनेल मेस्सीच्या बार्सिलोना स्पॅनिश लीगमध्ये अपयशच

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

लिओनेल मेस्सीच्या बार्सिलोनाचा ला लिगामधील पाय जास्तच खोलात जात आहे. ॲटलेटिको माद्रिदविरुद्धच्या पराभवाने बार्सिलोनास त्यांच्या तीन दशकातील सर्वात खराब कामगिरीस सामोरे जावे लागत आहे. 

माद्रिद :  लिओनेल मेस्सीच्या बार्सिलोनाचा ला लिगामधील पाय जास्तच खोलात जात आहे. ॲटलेटिको माद्रिदविरुद्धच्या पराभवाने बार्सिलोनास त्यांच्या तीन दशकातील सर्वात खराब कामगिरीस सामोरे जावे लागत आहे. 

ॲटलेटिको माद्रिदने दहा वर्षांत प्रथमच बार्सिलोनास हरवले. गेरार्ड पिक्वे आणि मार्क आंद्रे तेर स्टेगेन या बार्सिलोनाच्या अनुभवी खेळाडूंच्या चुकीचा फायदा घेत यान्निक कॅरास्को याने निर्णायक गोल करीत ॲटलेटिकोस १-० विजयी केले. या विजयामुळे ॲटलेटिकोने ला लिगात दुसरा क्रमांक मिळवताना रेयाल माद्रिदला मागे टाकले, पण त्याहीपेक्षा बार्सिलोनाची अपयशी मालकी जास्त चर्चेत आहे. गोलची संधी असतानाही मेस्सीत दिसलेला आत्मविश्‍वासाचा अभाव ही बार्सिलोनासाठी चिंतेची बाब असेल. 

ला लिगा अर्थात स्पॅनिश लीगमधील सुरुवातीच्या आठ सामन्यांनंतर बार्सिलोनाचे अवघे ११ गुण आहेत. ही त्यांची १९९१-९२ नंतरची सर्वात खराब कामगिरी आहे. पण त्यावेळी त्यांनी स्पर्धा जिंकली होती, असा इशाराही इतिहास देत आहे. सध्या तरी बार्सिलोना लीगमध्ये दहावे आहेत. या अपयशास अर्थातच मीच जबाबदार आहे, पण अजूनही माझा खेळाडूंवर पूर्ण विश्‍वास आहे, असे बार्सिलोनाचे मार्गदर्शक रोनाल्ड कोएमन यांनी सांगितले. दरम्यान, रेयाल माद्रिदला व्हेलारेयालविरुद्ध १-१ बरोबरी स्वीकारावी लागली.

टॉटनहॅम अव्वल स्थानी

लंडन : टॉटनहॅमने मॅंचेस्टर सिटीला २-० असे पराजित करीत प्रीमियर लीगमध्ये अग्रस्थान मिळवले. सहा वर्षांत प्रथमच टॉटनहॅमला हे साध्य झाले. चेल्सीने न्यूकॅसलचा पाडाव करीत दुसरा क्रमांक मिळवला. मॅंचेस्टर युनायटेडने घरच्या मैदानावरील विजयाचा दुष्काळ संपवताना वेस्ट ब्रॉमचा १-० असा पाडाव केला. जोस मॉरिन्हो यांनी टॉटनहॅमची सूत्रे घेतल्यास एक वर्ष झाले. त्यांनी या मोसमात सलग आठ सामन्यांत हार पत्करलेली नाही. त्यांनी १९६१ पासूनचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचे लक्ष्य बाळगले आहे. त्यांनी चेल्सीला दोन गुणांनी मागे टाकले आहे. सिटी अकरावे आहेत. त्यांच्यात आणि टॉटनहॅममध्ये आठ गुणांचा फरक आहे.

रोनाल्डोचे पुन्हा दोन गोल

रोम ः ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या दोन गोलमुळे युव्हेंटिसने सिरी ए मध्ये कॅगलिआरीचा २-० असा पाडाव केला. रोनाल्डोने पाच सामन्यांत तिसऱ्यांदा दोन गोल करण्याची कामगिरी केली. कोरोना झाल्यानंतर रोनाल्डो जास्तच जोषाने मैदानात उतरला आहे. त्याने पुनरागमनानंतर पाच सामन्यांत आठ गोल केले आहेत.

अधिक वाचा : 

आंगुलोच्या धडाक्यामुळे एफसी गोवाने बंगळूरला बरोबरीत रोखले

ओडिशा एफसीविरुद्धच्या आजच्या लढतीत हैदराबाद संघाची प्रतिष्ठा पणास

संबंधित बातम्या