क्रिकेट आयोजनाबाबत गोव्याला विचारणा

क्रिकेट आयोजनाबाबत गोव्याला विचारणा
BCCI is approaching Goa to organise cricket matches

पणजी  :  भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आगामी देशांतर्गत क्रिकेट मोसम जैवसुरक्षा वातावरणात खेळविण्यास इच्छुक आहे. जेथे प्रवास कमी, किमान तीन मैदानांची उपलब्धतता आणि पंचतारांकीत हॉटेलची सोय शक्य असलेल्या संलग्न संघटनांकडे त्यांनी आयोजनाबाबत विचारणा केली असून त्यात गोवा क्रिकेट असोसिएशनचाही समावेश आहे.
गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) उच्चस्तरीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी जीसीएचे अध्यक्ष सूरज लोटलीकर यांच्याशी चर्चा झाली असून त्यावेळी सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० किंवा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील सामने खेळविणे गोव्यात शक्य आहे याबाबत चाचपणी केली होती.

प्राप्त माहितीनुसार, बीसीसीआयच्या प्रशासकीय कार्यालयाकडूनही यासंबंधी विचारणा झाली आहे. आयपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी लोटलीकर बीसीसीआयचे निमंत्रित होते, त्यावेळी त्यांनी गांगुली यांची भेट घेतली होती. वृत्तसंस्थेनुसार, टी-२०, तसेच रणजी करंडक स्पर्धा घेण्याबाबत बीसीसीआयने अंदाजे १० संलग्न संघटनांशी संपर्क साधला आहे. रणजी स्पर्धेपूर्वी जानेवारीत टी-२० स्पर्धा घेण्यास बीसीसीआय अनुकूल आहे. कोविड-१९ सुरक्षाविषयक मार्गदर्शक शिष्टाचारानुसार क्रिकेट स्पर्धा खेळविण्यात येतील.

गोव्यातील तीन स्टेडियमवर येत्या शुक्रवारपासून (ता. २०) इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेचा सातवा मोसम जैवसुरक्षा वातावरणात  सुरू होईल. त्या पार्श्वभूमीवर गोव्यात क्रिकेट स्पर्धा खेळविणे शक्य आहे का याबाबत बीसीसीआय चाचपणी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पर्वरी, पणजी जिमखाना व मडगाव क्रिकेट क्लबचे मैदान उपलब्ध असल्याने गोव्याला यजमानपद मिळाल्यास आव्हान पेलण्याबाबत सकारात्मक संदेश जीसीएने बीसीसीआयला पाठविला आहे. सांगे येथील मैदान राखीव ठेवण्याचे जीसीएने ठरविले आहे, असे सूत्राने सांगितले. हॉटेल आरक्षणाबाबत अडचण येणार नाही असे जीसीएला वाटते.
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com