आता 'आयपीएल'मध्ये आठ ऐवजी दहा संघ

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 25 डिसेंबर 2020

आयपीएलमधील दोन वाढीव संघांच्या निर्णयावर बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधरण सभेत शिक्कामोर्तब झाले. आठऐवजी १० संघांची आयपीएल २०२२ पासून पाहायला मिळेल, त्यामुळे चार महिन्यांनी होणारी २०२१ मधील आयपीएल आठ संघांचीच असेल.

अहमदाबाद : आयपीएलमधील दोन वाढीव संघांच्या निर्णयावर बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधरण सभेत शिक्कामोर्तब झाले. आठऐवजी १० संघांची आयपीएल २०२२ पासून पाहायला मिळेल, त्यामुळे चार महिन्यांनी होणारी २०२१ मधील आयपीएल आठ संघांचीच असेल. कोरोना आणि लॉकडाऊननंतर प्रथमच झालेल्या (ऑनलाईन नसलेल्या) बीसीसीआयच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. देशांतर्गत खेळाडूंना बीसीसीआयने नववर्षाची भेट दिली आहे. महामारीमुळे यंदाचा स्थानिक मोसम कमी स्पर्धा-सामन्यांचा होत असला, तरी पुरुष आणि महिला प्रथम श्रेणी खेळाडूंना नुकसान भरपाई मिळणार आहे. यंदाचा देशांतर्गत मोसम जानेवारीच्या सुरुवातीपासून मुश्‍ताक अली राष्ट्रीय ट्‌वेन्टी-२० स्पर्धेपासून सुरू होणार आहे.

२०२८ च्या लॉस एंजलिस ऑलिंपिकमध्ये क्रिकेटला (ट्‌वेन्टी-२०) स्थान मिळवण्यासाठी आयसीसी करत असलेल्या प्रयत्नांना तत्त्वतः पाठिंबा देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. आयसीसीकडून काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण मिळाल्यानंतर बीसीसीआयने आपली मंजुरी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अमिरातीत झालेली आयपीएल संपता संपता पुढच्या स्पर्धेत दोन अधिक संघांची चर्चा सुरू झाली होती, परंतु २०२१ की २०२२ मध्ये दोन अतिरिक्त संघांचा समावेश करावा याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. अमिरातीतील आयपीएल संपल्यानंतर पुढच्या स्पर्धेसाठी काही महिन्यांचाच कालावधी असल्याने नव्या संघांच्या मालकीसाठी लिलाव, संघांचे लिलाव याकरिता वेळ नसल्याने २०२२ पासून १० संघांना मंजुरी देण्यात आली. आयपीएलमध्ये आता ज्या शहरातील किंवा राज्यांतील संघ आहेत त्यातील नवे दोन संघ नसावेत यावरही एकमत झाले. त्यामुळे दोन नवे संघ अहमदाबाद, राजकोट, विशाखापट्टणम, कोची-तिरुअनंतपुरम किंवा लखनौ या राज्यांतून असतील.

 

पंच, गुणलेखकांच्या निवृत्ती वयात बदल

बीसीसीआयशी संलग्न असलेल्या पंच आणि गुणलेखकांच्या निवृत्ती वयात बदल करण्यात आला असून ५५ वर्षावरून ६० असे निवृत्तीचे वय करण्यात आले आहे. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बीसीसीआयशी सध्या १४० पंच संलग्न आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंचांच्या निवृत्तीचे वय ५८ आहे, परंतु बीसीसीआयने २००२ मध्ये ते ५५ असे केले होते

 

रणजी स्पर्धेबाबत आशा कायम

बीसीसीआय बायोबबल वातावरण तयार करुन मुश्‍ताक अली राष्ट्रीय ट्‌वेन्टी-२० स्पर्धा घेत आहे, परंतु अजूनही रणजी स्पर्धा आयोजित करण्याच्या आशा सोडलेल्या नाहीत. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली स्वतः रणजी स्पर्धेबाबत आशावादी आहेत. आयपीएल एप्रिल-मे या कालावधीत होणार आहे या वेळेत वयोगट तसेच महिला क्रिकेट स्पर्धां घेण्याचाही विचार करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या