आयपीएलमुळे बीसीसीआय मालामाल; किती पैसे मिळाले, वाचा...

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

भारतीय क्रिकेट मंडळाचे खजिनदार अरुण धुमळ यांनी या लीगचा अहवाल तयार केला आहे. त्यात आयपीएलद्वारे चार हजार कोटी रुपये मिळाले आहेत, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

नवी दिल्ली- आयपीएलच्या संयोजनामुळे भारतीय क्रिकेट मंडळाने चार हजार कोटी रुपयांची घवघवीत कमाई केली. त्याचबरोबर गतवर्षीच्या तुलनेत आयपीएलच्या दूरचित्रवाणी प्रेक्षकांतही वाढ झाली.

भारतीय क्रिकेट मंडळाचे खजिनदार अरुण धुमळ यांनी या लीगचा अहवाल तयार केला आहे. त्यात आयपीएलद्वारे चार हजार कोटी रुपये मिळाले आहेत, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. सूत्रांनी ही रक्कम नेमकी कशा स्वरूपात मिळाली याबाबत तपशील सांगणे टाळले, पण ही स्पर्धा घेताना स्टार स्पोर्टस्‌सह असलेला प्रक्षेपणाचा पाच वर्षासाठी असलेला १६ हजार ३४७ कोटींचा करार मोलाचा होता. 

भारतीय मंडळास आयपीएलने दिलेले उत्पन्न सुखावत आहे. कोरोनाच्या आक्रमणामुळे उत्पन्नावर परिणाम होईल हा विचार करून खर्च ३५ टक्‍क्‍यांनी कमी करण्यात आला होता. त्यानंतरही चांगले उत्पन्न मिळाल्याने मंडळाचे पदाधिकारी समाधानी आहेत. या अहवालात अमिरातीतील विविध स्टेडियमला बसने जाण्याची चांगली सुविधा होती, त्यामुळे अमिरातीस पसंती देण्यात आली याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. 

 

संबंधित बातम्या