बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आयपीएलचा आढावा घेण्यासाठी दुबईत दाखल

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

अनेक अडचणी पार करत होत असलेली ही आयपीएल बीसीसीआय आणि भारतीय क्रिकेटसाठी सर्वार्थाने महत्त्वाची आहे. जवळपास सहा महिन्यांनी भारतीय खेळाडू मैदानात उतरणार आहे. त्याचबरोबर आयपीएल सुरू होताच बीसीसीआयच्या अर्थकारणाचेही चक्र सुरू होणार आहे. 

दुबई: तब्बल सहा महिन्यानंतर प्रथमच परदेशवारी करणारे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली अमिरातीत होत असलेल्या आयपीएलचा आढावा घेण्यासाठी दुबईत दाखल झाले आहेत. गांगुली यांनी विमानासोबत आणि विमानात बसलेले अशी दोन छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत.

सहा महिन्यानंतर माझे पहिले फ्लाईट आयपीएलसाठी दुबईकडे... आयुष्यातील बदल कसे चमत्कारिक असतात, असे गांगुली यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी गांगुली यांनी पुरेपूर काळजी घेतली आहे. विमानात बसण्यापूर्वी तोंडावर दोन मास्क आणि चेहऱ्यावर फेस शिल्डही लावलेली आहे. विमानात मात्र छायाचित्र काढताना फेस शिल्ड काढलेली दिसत आहे. 

अनेक अडचणी पार करत होत असलेली ही आयपीएल बीसीसीआय आणि भारतीय क्रिकेटसाठी सर्वार्थाने महत्त्वाची आहे. जवळपास सहा महिन्यांनी भारतीय खेळाडू मैदानात उतरणार आहे. त्याचबरोबर आयपीएल सुरू होताच बीसीसीआयच्या अर्थकारणाचेही चक्र सुरू होणार आहे. 

या कालावधीत ऑस्ट्रेलियात ट्‌वेन्टी- २० ची विश्‍वकरंडक स्पर्धा होणार होती; परंतु ती पुढे ढकलण्यात आल्यामुळे आयपीएलसाठी हा कालावधी मिळवण्याकरिता गांगुलीने नेटाने किल्ला लढवला होता. आयपीएल रद्द झाली असती, तर बीसीसीआयला ४ हजार कोटींचे नुकसान झाले असते, असे गांगुलीने दोन महिन्यांपूर्वीच म्हटले होते. आता परदेशात आयपीएल होत असली, तरी अपेक्षित मूळ नफा मिळणार नसला, तरी बऱ्यापैकी फायदा मिळणार आहे. 

येत्या १९ सप्टेंबरला गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यातील सामन्याने आयपीएलचे बिगूल वाजणार आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या