सर्वकष पाहणी केल्यानंतरच आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करणार: बीसीसीआय

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020

आयपीएलचा कार्यक्रम निश्‍चित होण्यास उशीर होत आहे, पण संघ फ्रॅंचाईज परिस्थितीचा आढावा घेत आहेत, तसेच सुविधांची पाहणी करीत आहेत. या आठवड्यात कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असे ब्रिजेश पटेल यांनी सांगितले.

दुबई / नवी दिल्ली: आयपीएलसाठी संयुक्त अरब अमिरातीत असलेल्या सुविधांची पाहणी करण्यासाठी भारतीय क्रिकेट मंडळाचे पथक दाखल झाले आहे. या पथकाने सर्वकष पाहणी केल्यानंतरच लीगचे वेळापत्रक तयार होण्याची चिन्हे दिसत आहेत. 

आयपीएल प्रशासकीय समितीचे प्रमुख ब्रिजेश पटेल, मंडळाचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी हेमांग अमीन यांच्यासह आंतरराष्ट्रीय मार्केटिंग ग्रुप, इव्हेंट मॅनेजर्सचाही या पथकात समावेश असल्याचे समजते. अर्थात या पथकातील सर्वांना सहा दिवस विलगीकरणात रहावे लागणार आहे. 

आयपीएलचा कार्यक्रम निश्‍चित होण्यास उशीर होत आहे, पण संघ फ्रॅंचाईज परिस्थितीचा आढावा घेत आहेत, तसेच सुविधांची पाहणी करीत आहेत. या आठवड्यात कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असे ब्रिजेश पटेल यांनी सांगितले. आयपीएल प्रशासकीय समिती आयएमजी या इव्हेंट मॅनेजमेंटच्या पथकासह संघांची निकड, तसेच स्पर्धेच्या सुरळीत संयोजनातील अडचणी दूर करण्यास प्राधान्य देत आहेत. भारतीय मंडळाचे पथक स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच सर्व काही अंतिम होईल, असे सांगण्यात आले. 

दरम्यान, महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर रोहित शर्माने केलेल्या ट्विटकडे क्रिकेट अभ्यासक लक्ष वेधत आहेत. आयपीएलच्या सलामीच्या दिवशी नाणेफेकीच्यावेळी भेटू असे ट्विट रोहितने केले होते. मात्र भारतीय मंडळाचे काही पदाधिकारी एप्रिलमध्ये कार्यक्रम ठरला होता, त्यावेळी सलामीला मुंबई-चेन्नई लढत होती, याकडे लक्ष वेधत आहेत. आयपीएल एकंदर ५३ दिवसांची आहे. त्यातील दहा दिवस दोन लढती असतील, असे यापूर्वी ठरले आहे. 

लवचिक वेळापत्रकाचा विचार
आयपीएलचे वेळापत्रक तयार करताना त्यात लवचिकता असावी, हा प्रयत्न होत आहे. एखाद्या संघातील खेळाडूस कोरोनाची बाधा झाल्यास अन्य खेळाडूंचीही चाचणी होईल. त्या कालावधीत त्या संघास कदाचित खेळता येणार नाही. त्यावेळी कार्यक्रमात चटकन बदल करण्याच्या उद्देशाने वेळापत्रक तयार होत असल्याचे समजते. याचबरोबर ऑक्‍टोबरच्या पूर्वार्धापर्यंत दुपारी आयपीएलचे सामने खेळणे त्रासदायक असेल. या परिस्थितीत ऑक्‍टोबरच्या उत्तरार्धात जास्तीत जास्त डबल हेडर घेण्याचा विचार सुरू आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या