महेंद्रसिंग धोनीसाठी निरोपाचा सामना खेळवण्यास बीसीसीआय उत्सुक

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑगस्ट 2020

भारतीय संघासाठी आता सध्या कोणतीही आंतरराष्ट्रीय सामने नाहीत. आयपीएलनंतर हा योग कसा जुळून येतो, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.

नवी दिल्ली: सामना खेळून निवृत्त होण्याची संधी महेंद्रसिंग धोनीला मिळाली नाही; पण धोनीने तयारी दर्शवली; तर हा योगायोग जुळून येऊ शकतो. धोनीला निरोपाचा सामना देण्यास बीसीसीआय उत्सुक असल्याचे भारतीय क्रिकेट मंडळाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.

अमिरातीत होत असलेल्या आगामी आयपीएल स्पर्धेच्या वेळी आम्ही धोनीशी चर्चा करणार आहोत. असे या पदाधिकाऱ्याने एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

भारतीय संघासाठी आता सध्या कोणतीही आंतरराष्ट्रीय सामने नाहीत. आयपीएलनंतर हा योग कसा जुळून येतो, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. भारतीय क्रिकेटसाठी धोनीचे योगदान अतिउच्च आहे. त्यामुळे निवृत्तीचा सन्मान त्याला मिळायलाच हवा. धोनी जेव्हा कधी निवृत्त होईल, तेव्हा त्याच्यासाठी निरोपाचा सामना खेळवायचा, हा विचार आम्ही केला होता; परंतु महेंद्रसिंग  धोनीने अचानक निवृत्ती जाहीर केली. अशा प्रकारे तो निवृत्ती जाहीर करेल, याचा विचार कोणी केला नव्हता, असे बीसीसीआयच्या या पदाधिकाऱ्याने म्हटले आहे.

या संदर्भात धोनीबरोबर तुमची चर्चा झाली आहे का, या प्रश्‍नावर या पदाधिकाऱ्याने सध्या तरी आम्ही धोनीशी संवाद साधलेला नाही; पण आयपीएल स्पर्धेच्या वेळी आम्ही त्याच्याशी या विषयावर चर्चा करणार आहोत. सामना किंवा मालिका त्याच वेळी निश्‍चित करू. काहीही असले आणि धोनीने होकार नकार काहीही दर्शवला, तरी त्याच्यासाठी आम्ही भव्य निरोपसमारंभ आयोजित करणार आहोतच.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या