बेदिया ठरणार एफसी गोवाचा विक्रमी ‘परदेशी’

Dainik Gomantak
मंगळवार, 9 जून 2020

तीन मोसमानंतर स्पॅनिश फुटबॉलपटूचा करार २०२२ पर्यंत वाढविला

पणजी

भारतीय फुटबॉलमधील २०२०-२१ मोसम सुरू झाल्यानंतर, एफसी गोवा संघातर्फे सर्वाधिक काळ खेळणारा परदेशी फुटबॉलपटू हा विक्रमी मान स्पेनचा मध्यरक्षक एदू बेदिया याला मिळेल.

या ३१ वर्षीय खेळाडूशी एफसी गोवाने २०२२ मोसमअखेरपर्यंत करार केला आहे. एदू बेदिया २०१७-१८ पासून एफसी गोवाचा आधारस्तंभ असून २०२०-२१ हा त्याचा गोव्यातील संघातर्फे सलग चौथा मोसम असेल.

‘‘एफसी गोवासोबतचा प्रवास कायम राखण्यात मी आनंदित आहे,’’ अशी प्रतिक्रिया बेदिया याने एफसी गोवाच्या नव्या करारपत्रावर सही केल्यानंतर नमूद केले. ‘‘माझ्यासाठी आतापर्यंतचा हा अनुभव अद्भूत आहे. भविष्यातही या संघाचा भाग होण्यासाठी मी उत्सुक आहे. माझ्यापाशी काही खूप चांगले क्षण आहेत आणि येथे माझ्या वास्तव्यात आणखीनच मोठे यश मिळवायचे आहे,’’ असे हा स्पॅनिश खेळाडू म्हणाला. एदू बेदिया स्पेनमधील ला-लिगा स्पर्धेत, तसेच बार्सिलोनाच्या ब संघातूनही खेळला आहे.

यशस्वी मोहीम

एदू बेदियाने २०१७-१८ मोसमात एफसी गोवाशी करार केला, त्यापूर्वी तो स्पेनमधील रियल झारागोझा संघाचा सदस्य होता. बेदियाच्या पहिल्या मोसमात एफसी गोवाने आयएसएल आणि सुपर कप स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. २०१८-१९ मोसमातील आयएसएल स्पर्धेत बेदियाने ७ गोल आणि ५ असिस्ट अशी अफलातून कामगिरी बजावली. त्या मोसमात एफसी गोवा संघ आयएसएल स्पर्धेत उपविजेता ठरला, तर सुपर कप स्पर्धेत विजेता ठरला.

 

`संघासाठी महत्त्वाचा घटक`

एदू बेदियाचा करार वाढविताना एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कुर यांनी सांगितले, की ‘‘एदू आमच्यासोबत कायम राहतोय ही बाब खूप आनंदित करणारी आहे. आमच्या संघासाठी एदू खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. भविष्यातही तो आमच्यासाठी प्रमुख घटक राहील याचा विश्वास आहे. त्याचा दर्जा साऱ्यांनी पाहिला आहे आणि आशा करतो, की एफसी गोवाच्या कपाटात आणखी करंडक आणण्यात तो आम्हाला मदत करेल.’’

 

एफसी गोवासोबत एदू बेदिया...

- २०१७-१८ पासून संघात, हुकमी मध्यरक्षक

- आयएसएल स्पर्धेत ५१ सामने, ९ गोल

- पहिला गोल जानेवारी २०१८ मध्ये केरळा ब्लास्टर्सविरुद्ध

- २०१८-१९ मोसमात ७ गोल, ५ असिस्ट

- ३ आयएसएल मोसमात ३३८५ पासेस, त्यापैकी ३०७१ अचूक

 

संबंधित बातम्या