INDvsENG 4th T20 : इंग्लंडच्या पराभवाचे कारण स्पष्ट करताना बेन स्टोक्स म्हणतो...    

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 19 मार्च 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-ट्वेन्टी मालिकेतील चौथा सामना काल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत पाहुण्या इंग्लंडच्या संघावर आठ धावांनी विजय मिळवला आहे.

अहमदाबाद : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-ट्वेन्टी मालिकेतील चौथा सामना काल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत पाहुण्या इंग्लंडच्या संघावर आठ धावांनी विजय मिळवला आहे. आणि त्यासोबतच मालिकेत भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ प्रत्येकी दोन सामने जिंकत बरोबरीवर पोहचले आहेत. व यामुळे आता दोन्ही संघातील पाचवा आणि अंतिम सामना निर्णायक ठरणार आहे. 

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-ट्वेन्टी सामन्यात टीम इंडियाने धमाका करत विजय मिळवला. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 185 धावा केल्या होत्या. आणि त्यानंतर इंग्लंडच्या संघाला विराट कोहलीच्या नेतृत्वखाली संघाने 177 धावांवर रोखले. त्यामुळे इंग्लंडच्या संघाला 8 धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात इंग्लंड कडून बेन स्टोक्स वगळता इतर कोणताही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. यानंतर बेन स्टोक्सने सामना झाल्यावर बोलताना, इंग्लंडचा संघ सहज विजय मिळवेल असे वाटत होते, परंतु शार्दुल ठाकूरने एकाच षटकात दोन गडी राखून सामन्याला कलाटणी दिल्याचे सांगितले. 

 इंग्लंडविरुध्दच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

चौथ्या सामन्यात इंग्लंडकडून 46 धावांची खेळी करणाऱ्या बेन स्टोक्सने संघाच्या पराभवावर बोलताना, सुरवातीच्या फळीतील फलंदाजांवर खापर फोडले.  त्याने संघाच्या कोणत्याही वरच्या फळीतील फलंदाजांनी शेवटपर्यंत फलंदाजी करायला हवी होती, असे मत व्यक्त केले. व यासाठी कारण देताना, मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी खालच्या फळीतील खेळाडूंवर अवलंबून राहणे आदर्श म्हणता येणार नसल्याचे सांगितले. मोठ्या लक्ष्याच्या पाठलाग करताना,  सुरवातीचा कोणताही फलंदाज शेवटपर्यंत किंवा काही काळ तरी मैदानावर राहणे गरजेचे होते. आणि तसे झाले असते तर नक्कीच संघाचा विजय झाला असता असे बेन स्टोक्स म्हणाला. 

IND vs ENG: टीम इंडिया विरुद्ध टी -20 सामन्यात थर्ड अंपायरने 'ते' 2...

याशिवाय आगामी शेवटच्या व निर्णायक सामन्याबाबत बोलताना, आम्हाला विजय मिळवण्याची सवय करून घ्यावी लागणार असल्याचे बेन स्टोक्सने पुढे नमूद केले. तसेच, दबाव परिस्थितीत जितके जास्त चांगले खेळता येईल त्याचा पुढे फायदा होणार असल्याचे बेन स्टोक्स म्हणाला. आणि या गोष्टीचा सर्वात अधिक फायदा यावर्षी भारतात खेळल्या जाणार्‍या टी-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेत होणार असल्याचे त्याने अधोरेखित केले. व या स्पर्धेत प्रत्येक सामना हा महत्वाचा राहणार असल्याचे तो पुढे म्हणाला. त्यानंतर, या मालिकेच्या माध्यमातून इंग्लंडचा संघ टी-ट्वेन्टी वर्ल्डकपचीही तयारी करत असल्याचे बेन स्टोक्सने पुढे सांगितले. 

दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी-ट्वेन्टी सामन्यात इंग्लंडच्या संघाने विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत इंग्लंडवर विजय मिळवला होता. यानंतर तिसऱ्या सामन्यात पाहुण्या इंग्लंडच्या संघाने विजय मिळवल्यामुळे मालिकेत आघाडी मिळवली होती. मात्र आता चौथ्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवल्याने पुन्हा दोन्ही संघ मालिकेत बरोबरीत आले आहेत. व आता दोन्ही देशांमधील शेवटचा सामना 21 मार्च रोजी खेळवला जाईल.

 

संबंधित बातम्या