बुद्धिबळपटू भक्ती कुलकर्णीची भारतीय संघात निवड

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑक्टोबर 2020

अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे सचिव विजय देशपांडे यांनी भारताचा पुरूष व महिला बुद्धिबळ संघ जाहीर केला आहे. मेरी अॅन गोम्स संघाची कर्णधार आहे. भक्तीसह आर. वैशाली, पद्मिनी रौत, पी. व्ही. नंधिधा या संघातील अन्य खेळाडू आहेत. पुरूष संघाचे नेतृत्व सूर्यशेखर गांगुली करेल.

पणजी-सलग दोन वर्षे राष्ट्रीय महिला बुद्धिबळात विजेती असलेली गोव्याची आंतरराष्ट्रीय बुद्धीबळपटू भक्ती कुलकर्णी हिची आशियाई नेशन्स कप ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. स्पर्धा १० ते २५ ऑक्टोबर या कालावधीत खेळवली जाणार आहे. 

अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे सचिव विजय देशपांडे यांनी भारताचा पुरूष व महिला बुद्धिबळ संघ जाहीर केला आहे. मेरी अॅन गोम्स संघाची कर्णधार आहे. भक्तीसह आर. वैशाली, पद्मिनी रौत, पी. व्ही. नंधिधा या संघातील अन्य खेळाडू आहेत. पुरूष संघाचे नेतृत्व सूर्यशेखर गांगुली करेल. के. शशिकिरण, बी, अधिवन, एस. पी. सेथुरमण, निहाल सरीन, हे संघातील खेळाडू आहेत. आशियाई बुद्धिबळ महासंघाच्या मानांकन यादीनुसार, नेशन्स कप स्पर्धेत पुरूष व महिला गटात भारताला अव्वल गटात मानांकन आहे. 

भक्तीने याआधी प्रथमच बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये देशाचे प्रतिनिधित्व  केले. तिने नोव्हेंबर २०१८ मध्ये  सर्वप्रथम राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद मिळवले. २०१९ साली तमिळनाडूत झालेल्या स्पर्धेत तिने जेतेपद आपल्याकडेच राखले. गतवर्षीच तिच्या इंटरनॅशनल मास्टर किताबावरही शिक्कामोर्तब झाले होते. आयएम किताबधारक असलेली भक्ती गोव्याची पहिली महिला बुद्धिबळपटू आहे. आशियाई नेशन्स कप स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्द्ल गोवा बुद्धिबळ संघटनेने भक्तीचे अभिनंदन केले असून युयश चिंतीले आहे. 

संबंधित बातम्या