ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये भक्तीची ‘ऑल विन’ वाटचाल
Bhakti wins all three matches in online chess Olympiad

ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये भक्तीची ‘ऑल विन’ वाटचाल

पणजी: बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये भारताचे प्रथमच प्रतिनिधित्व करणारी गोव्याची इंटरनॅशनल मास्टर भक्ती कुलकर्णी हिने शानदार खेळ केला. फिडेच्या या ऑनलाईन स्पर्धेत तिने तिन्ही सामने जिंकून अपराजित वाटचाल राखली.

भक्तीने गट अ साखळी फेरीत इंडोनेशिया, जर्मनी आणि झिंबाब्वेविरुद्ध विजयाची नोंद केली. भारताने बलाढ्य चीनलाही नमवून गटात अव्वल स्थान मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्यामुळे भक्तीला कौशल्य प्रदर्शित करण्याची आणखी संधी असेल.

भक्तीने झिंबाब्वेची लिंडा शाबा, इंडोनेशियाची इंटरनॅशनल मास्टर मेदिना वार्दा ऑलिया व जर्मनीची वूमन ग्रँडमास्टर फिलिझ ओस्मानोजा या खेळाडूंना हरविले. भारताने या स्पर्धेत झिंबाब्वे, व्हिएतनाम, उझबेकिस्तान, इंडोनेशिया, इराण, जॉर्जिया व चीन या संघांना हरविले, तर कर्णधार विदित गुजराथी व कोनेरी हंपी या प्रमुख खेळाडूंना त्यांच्या भागातील खंडित वीजपुरवठ्याचा फटका बसल्यामुळे मंगोलियाविरुद्ध बरोबरी मानावी लागली. भारताने अ गटात सर्वाधिक ३९.५ गुण नोंदीत केले, तर चीनच्या खाती ३९ गुण जमा झाले.  

सलग दोन वर्षे राष्ट्रीय महिला विजेती असलेली भक्ती प्रथमच बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. ऑलिंपियाड स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने खेळण्याचा अनुभव रोमांचक असल्याचे तिचे म्हणणे आहे. भक्तीने नोव्हेंबर २०१८ मध्ये सर्वप्रथम राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद मिळविले, गतवर्षी तमिळनाडूत झालेल्या स्पर्धेत तिने हे जेतेपद आपल्याकडेच राखले.

संपादन: ओंकार जोशी

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com