ऑनलाईन ऑलिंपियाड: प्रतिकूल परिस्थितीत विजेतेपद जिंकण्याचा आनंद अविस्मरणीय: विश्‍वनाथन आनंद

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 31 ऑगस्ट 2020

ऑनलाईन ऑलिंपियाडमध्ये विजेतेपद जिंकल्यामुळे मी खूष आहे. सांघिक विजेतेपदाचा आनंद मोलाचा असतो, असे आनंदने सांगितले.

मुंबई: ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिंपियाड जिंकल्याचा आनंद मोलाचा आहे. अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या, पण हे विजेतेपद अनेक वर्षे हुलकावणी देत होते. त्यामुळे या यशाचा आनंद अविस्मरणीय आहे, असे विश्‍वनाथन आनंदने सांगितले.

ऑनलाईन ऑलिंपियाडमध्ये विजेतेपद जिंकल्यामुळे मी खूष आहे. सांघिक विजेतेपदाचा आनंद मोलाचा असतो, असे आनंदने सांगितले. आनंदने जागतिक बुद्धिबळातील सर्व प्रकारचे वैयक्तिक विजेतेपद जिंकले आहे, पण त्याने प्रथमच देशासाठी सांघिक विजेतेपद जिंकले. या यशाबद्दल आनंद म्हणाला, भारताने या लढतीच्यावेळी सर्व पूर्वतयारी करताना प्रत्येक गोष्टी लक्षात घेतल्या होत्या. या स्पर्धेत संघातील सगळ्याच खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. हंपी, दिव्या देशमुख यांनी प्रभावी यश मिळवले. या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूंनी संघ प्रतिकूल परिस्थितीत असताना आपली कामगिरी उंचावली. 

भारतीय उपकर्णधार श्रीनाथने या विजयाचे श्रेय कर्णधार विदीत गुजरातीस दिले. त्याने आघाडीच्या खेळाडूंचा चांगल्या प्रकारे सामना केलाच, त्याचबरोबर प्रतिस्पर्धींच्या खेळाचा विचार करून संघात योग्य कोण ठरेल याबाबत विचार केला आणि ते निर्णायक ठरले. 

सुवर्णपदक जिंकल्याचा आनंद शब्दांत कसा व्यक्त करावा हे समजत नाही. कमालीची तणावपूर्ण स्पर्धा झाली. त्याचा थकवाही खूप आला. अनेक चढउतार आले. त्यामुळे दडपण आले. त्यास सामोरे जात बाजी मारली. त्याचा आनंद आहे. हे विजेतेपद आमच्या सर्वांसाठी खूपच मोलाचे आहे. - विदीत गुजराती

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या