अचूक गोलंदाजी आता महत्त्वाची: ट्रेंट बोल्ट

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

अमिरातीमधील खेळपट्ट्या कोरड्या होत आहेत; तसेच त्यांचा वेगही कमी झाला आहे. त्यामुळे अचूक मारा केल्यासच यश मिळते, असे ट्रेंट बोल्टने सांगितले.

शारजा:  अमिरातीमधील खेळपट्ट्या कोरड्या होत आहेत; तसेच त्यांचा वेगही कमी झाला आहे. त्यामुळे अचूक मारा केल्यासच यश मिळते, असे ट्रेंट बोल्टने सांगितले. बोल्टच्या भेदक माऱ्यामुळे मुंबईने आयपीएलमध्ये चेन्नईविरुद्ध सहज विजय मिळवला. 

लसिथ मलिंगाऐवजी मुंबईने डावखुऱ्या बोल्टला करारबद्ध केले. चेन्नईविरुद्ध त्याने घेतलेल्या चारपैकी तीन विकेट पॉवरप्लेमध्ये होत्या. ‘‘नव्या फ्रॅंचाईजकडून खेळलो. नवे सहकारी होते. सध्याच्या  परिस्थितीत खेळण्याचा अनुभवही नवा होता, त्याचेही औत्सुक्‍य होते. गोलंदाजीबाबत बोलायचे तर चेंडूचा टप्पा पुढे ठेवला, तर खेळपट्टीची साथ काही प्रमाणात लाभते,’ असेही बोल्टने सांगितले.

बोल्टने या स्पर्धेत आत्तापर्यंत १६ फलंदाज बाद केले आहेत. तो म्हणाला, नव्या चेंडूवर पहिले षटक टाकण्याची संधी मिळत आहे. चेंडू स्विंग होणार असेल, तर त्याचा टप्पा पुढेच ठेवणे गरजेचे असते. येथील खेळपट्ट्यांचा वेग कमी होत आहे. तसेच त्या कोरड्याही होत आहे. त्यामुळे अचूकता जास्त महत्त्वाची ठरणार आहे.

संबंधित बातम्या