गोव्यात येण्याबाबत बूमूस द्विधा मनःस्थितीत

Dainik Gomantak
शुक्रवार, 19 जून 2020

एफसी गोवा संघाकडून पुन्हा खेळण्याबाबत बूमूस याने अजून निश्चित केलेले नाही.

पणजी

गतमोसमातील इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेत एफसी गोवा संघासाठी अफलातून खेळ केलेला फ्रेंच मध्यरक्षक ह्यूगो बूमूस पुन्हा गोव्यात येण्याबाबत द्विधा मनःस्थितीत आहे. त्यामुळे तो २०२०-२१ मोसमात आयएसएल लीग शिल्ड विजेत्या संघाकडून खेळण्याबाबत साशंकता आहे.

प्राप्त वृत्तानुसारएफसी गोवा संघाकडून पुन्हा खेळण्याबाबत बूमूस याने अजून निश्चित केलेले नाही. माजी आयएसएल उपविजेत्या संघाबरोबरचा त्याचा करार २०२२ पर्यंत आहे. या २४ वर्षीय हुकमी मध्यरक्षकाला अटी आणि नियमांची पूर्तता केल्याशिवाय एफसी गोवा संघाला सोडचिठ्ठी देता येणार नाही.

गतमोसमातील आयएसएल स्पर्धेत बूमूस गोल्डन बॉलचा मानकरी ठरला होता. याशिवाय गतमोसमात फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम आयएसएल खेळाडू हा मानही त्याला मिळाला होता. अफलातून खेळ करताना बूमूसने ११ गोल आणि १० असिस्ट अशी लाजवाब कामगिरी बजावली होती.

मोरोक्कोतील मोघ्रेब तेतौन संघाकडून खेळलेला बूमूस जानेवारी २०१८ मध्ये एफसी गोव्याच्या ताफ्यात रुजू झाला. मान्युएल अराना याने एफसी गोवा संघ सोडण्याचे ठरविल्यानंतरसर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघात तेव्हा बूमूसला संधी मिळाली होती. 

एफसी गोवातर्फे अडीच वर्षांच्या कालावधीत ४७ सामने खेळताना बूमूसने २० गोल नोंदविले आहेत. २०१९ मध्ये सुपर कप जिंकलेल्या एफसी गोवाचा तो प्रमुख खेळाडू होता.

संबंधित बातम्या