बुंडेस्लिगा फुटबॉल लीगमध्ये १० हजार प्रेक्षकांना परवानगी

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

आगामी बुंडेस्लिगा क्‍लबच्या २०२०-२१ हंगामात शनिवारी होणाऱ्या या सामन्याला १० हजार चाहत्यांना  परवानगी दिली जाणार आहे. दरम्यान क्‍लबने प्रेक्षकांसाठी नवीन नियमावली तयार केली आहे.

डॉर्टमंड: जर्मनीतील बुंडेस्लिगा फुटबॉल लीगमध्ये १० हजार प्रेक्षकांना परवानगी देण्याची तयारी सुरू केली आहे. बोरसिया डॉर्टमंड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. डॉर्टमंडचा पुढील सामना १९ सप्टेंबर रोजी मॉन्चेन्ग्लॅडबॅचविरुद्ध खेळला जाईल. लीगच्या व्यवस्थापनाने स्टेडियममध्ये प्रेक्षकांना आणण्यासाठी सर्व क्‍लबांना मान्यता दिली आहे.

आगामी बुंडेस्लिगा क्‍लबच्या २०२०-२१ हंगामात शनिवारी होणाऱ्या या सामन्याला १० हजार चाहत्यांना  परवानगी दिली जाणार आहे. दरम्यान क्‍लबने प्रेक्षकांसाठी नवीन नियमावली तयार केली आहे. यामध्ये  स्टेडियमचा २० टक्के भाग वापरात येणार असून फक्त शहरातील नागरिकांनाच स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार आहे. सोबत आरोग्यविषयक नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे, असे बोरसिया डॉर्टमंडने सांगितले आहे. 

यापूर्वी मागील महिन्यात झालेल्या  एएमएक्‍स स्टेडियमवर  चेल्सी विरुद्ध  ब्राइटन यांच्यातील मैत्रीपूर्ण सामन्यात २५०० प्रेक्षकांना प्रवेश देण्यात आला होता. शिवाय २०१९-२० हंगाम कोरोना विषाणूमुळे प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात आला होता. दरम्यान इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये (ईपीएल) या महिन्याच्या अखेरीस एक हजार प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाण्याची शक्‍यता आहे. प्रीमियर लीगचा नवीन हंगाम १२ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे; मात्र कोरोनामुळे प्रेक्षकांशिवाय सामने खेळले जात आहेत.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या