"ही अभूतपूर्व कसोटी मालिका होती, भारतीयांना कोणी कधीच कमी लेखू शकत नाही"

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 19 जानेवारी 2021

ऑस्ट्रेलियन संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी भारतीय संघाचा खेळाडू रिषभ पंतचे कौतुक केले आहे.

ब्रिस्बेन :  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांची कसोटी मालिका भारतीय संघाने आपल्या खिशात घातली आहे. या मालिकेतील पहिला ऍडिलेड येथे खेळवण्यात आलेला सामना ऑस्ट्रेलियाच्या संघाने जिंकला होता. तर मेलबर्न येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली होती. यानंतर सिडनीतील तिसरा कसोटी सामन्याचा निकाल अनिर्णित राहिला होता. व शेवटच्या ब्रिस्बेन येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत या सामन्यात तीन विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे टीम इंडियाने कांगारूंसोबतची मालिका 2 - 1 ने जिंकली. भारताकडून मिळालेल्या परभावानंतर ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी काहीही ग्राह्य धरले जाऊ शकत नाही आणि भारतीय क्रिकेट संघाला कधीही कमी लेखू नये, असे म्हटले आहे.

भारतीय संघाने आज ऑस्ट्रेलियन संघाचा बालेकिल्ला म्हणून समजल्या जाणाऱ्या ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर विजय मिळवला. ही कामगिरी करण्यासाठी भारतीय संघाला 32 वर्षे आणि दोन महिने लागले. परंतु निम्म्याहून अधिक खेळाडूंना दुखापत झाली असताना देखील भारतीय संघाने अंतिम कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला तीन विकेट्सने पराभूत करून दाखविले. या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी भारतीय संघाचा खेळाडू रिषभ पंतचे कौतुक केले आहे.

यावेळी टीम इंडियाचं कौतुक करताना जस्टिन लँगर म्हणाले, “ही एक अभूतपूर्व कसोटी मालिका होती, जी भारताने जिंकली. यामुळे आंम्हाला वाईट वाटत असलं तरी हे भारताने त्यांच्या उत्कृष्ट खेळीमुळे मिळवलं आहे. यातून आम्ही बरेच धडे घेऊ. आजच्या पंतच्या खेळीमुळे मला हेडिंगलेमध्ये बेन स्टोक्सनी केलेल्या खेळीची आठवण झाली.”

यावेळी शुभमन गिलचं कौतुक करताना ते म्हणाले, “युवा शुभमन गिलनेही चांगली फलंदाजी केली,तसंच भारताच्या युवा गोलंदाजीमुळे आम्ही दबावात होतो. या कसोटी मालिकेचं संपूर्ण श्रेय घेण्यास भारत पात्र आहे. कोणीही भारतीयांना कधीच कमी लेखू शकत नाही. 125 करोड लोकांच्या नजरा तुमच्यावर खिळलेल्या असतात, या दबावात खेळणं हे खरोखरच कठीण काम आहे. मी भारताचं पुरेसं कौतुकदेखील करू शकत नाही."

 

 

 

संबंधित बातम्या