कर्णधार विराट कोहलीदेखील रोहितच्या दुखापतीबाबत साशंक

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020

रोहित शर्माच्या दुखापतीबाबत खूपच संभ्रम आहे. त्यामुळे अनेक गोष्टींबाबत अनिश्‍चितता आहे, तसेच स्पष्टताही नाही, असे स्पष्ट प्रतिपादन भारताचा कर्णधार विराट कोहलीने केले.

सिडनी : रोहित शर्माच्या दुखापतीबाबत खूपच संभ्रम आहे. त्यामुळे अनेक गोष्टींबाबत अनिश्‍चितता आहे, तसेच स्पष्टताही नाही, असे स्पष्ट प्रतिपादन भारताचा कर्णधार विराट कोहलीने केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय क्रिकेट मालिका सुरू असताना विराटने ही टिपण्णी केली.
 
रोहित आणि इशांत शर्मा हे अमिरातीहून भारतीय संघासोबतच ऑस्ट्रेलियास आले असते, तर तंदुरुस्त होऊन कसोटी मालिकेसाठी उपलब्ध झाले असते, असे सांगत कोहलीने भारतीय क्रिकेट मंडळास लक्ष्य केले. रोहित आणि इशांत हे ऑस्ट्रेलियातील पहिल्या दोन कसोटीसाठी किमान अनुपलब्ध असणार हे स्पष्ट झाले आहे.  

भारतीय संघनिवडीसाठी दुबईत बैठक होण्यापूर्वी दोन दिवस ई-मेल पाठवण्यात आला. त्यात आयपीएलमध्ये झालेल्या दुखापतीमुळे रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी अनुपलब्ध असेल असे सांगण्यात आले होते. त्यात रोहितला दोन आठवड्यांची विश्रांती तसेच पुनर्वसन प्रक्रियाही आवश्‍यक असल्याचे नमूद केले होते. दुखापतीबाबत रोहितला सर्व काही कल्पना दिल्याचेही त्यात म्हटले होते. त्यावेळी तो निवडीसाठी अनुपलब्ध आहे असेच वाटले. त्यानंतर तो आयपीएलमध्ये खेळला. त्यामुळे तो संघासोबत ऑस्ट्रेलियास येईल, असेच आम्हाला वाटले, पण तसे झाले नाही. तो आमच्यासोबत का आला नाही याबाबत आम्हाला काहीही माहिती नाही, असे विराटने सांगितले.

रोहितची तंदुरुस्त चाचणी ११ डिसेंबरला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत होणार आहे, हा ई-मेल आम्हाला (संघव्यवस्थापनास) नुकताच पाठवण्यात आला आहे. संघनिवडीपूर्वीचा ई-मेल आणि चाचणीची तारीख कळवणारा ई-मेल या दरम्यान कोणतीही माहिती आम्हाला अधिकृतपणे देण्यात आली नाही. आम्ही केवळ निर्णयाची प्रतिक्षा करीत आहोत, हे योग्य नव्हे. हे गोंधळात टाकणारेही आहे, असे कोहलीने सांगितले.
रोहित आणि इशांत थेट ऑस्ट्रेलियात आले असते तर ते कसोटीत खेळण्याची शक्‍यता उंचावली असती. आयपीएलमध्येच दुखापत झालेला साहा आमच्यासोबत आहे. त्याची पुनर्वसन प्रक्रिया सुरू आहे. त्याच्या उपलब्धतेबाबत आम्हाला नेमकी माहिती आहे. हेच रोहित आणि इशांतबाबत घडले असते. तंदुरुस्त होऊन ते कसोटी निवडीसाठी उपलब्ध राहिले असते, असेही भारतीय कर्णधार म्हणाला.

अधिक वाचा :

आयएसएलमध्ये फॉर्म परत मिळवण्यासाठी एफसी गोवाचा संघर्ष 

सिलाच्या गोलमुळे नॉर्थईस्टने केरळा ब्लास्टर्सला २-२ च्या बरोबरीत रोखले

संबंधित बातम्या