राष्ट्रीय क्रीडा सुविधांसाठी केंद्राकडून राज्याला ९७.८० कोटी; स्पर्धा ‘कोविड’मुळे लांबणीवर

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

या वर्षी २० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत नियोजित असलेली ३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ‘कोविड-१९’ उद्रेकामुळे लांबणीवर टाकण्यात आल्याचेही केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे नमूद केले.

पणजी: कोरोना विषाणू महामारीमुळे लांबणीवर पडलेल्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या साधनसुविधा निर्मिती आणि विकासासाठी केंद्र सरकारकडून गोवा सरकारला ९७.८० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यासंबंधीची माहिती केंद्रीय क्रीडा व युवा व्यवहारमंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी लोकसभेत दिली.

या वर्षी २० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत नियोजित असलेली ३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ‘कोविड-१९’ उद्रेकामुळे लांबणीवर टाकण्यात आल्याचेही केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे नमूद केले. या स्पर्धा आयोजनाचा नवा कालावधी निश्चित केल्यानंतर भारतीय ऑलिंपिक संघटना आणि राष्ट्रीय स्पर्धेच्या स्थानिक आयोजन समितीद्वारे कळविण्यात येईल, असेही केंद्रीय क्रीडामंत्री रिजिजू यांनी स्पष्ट केले आहे. स्पर्धा लांबणीवर टाकण्याच्या निर्णयाबाबत खेळाडू आणि संघांना राज्य सरकार, संबंधित क्रीडा महासंघ, क्रीडा मंडळ आदींद्वारे कळविण्यात आल्याचेही त्यांनी उत्तरात नमूद केले आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या