गोव्याचे रणजी क्रिकेटमध्ये शतकांचे शतक!

गोव्याचे रणजी क्रिकेटमध्ये शतकांचे शतक!
cricket

पणजी

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील द्विशतकी सामन्यांतील वाटचालीत गोव्याने शतकांचे शतक साजरे केले आहे. त्यात ३९ फलंदाजांनी हातभार लावताना एकूण १०७ शतकांची नोंद केली.

कर्नाटकातील भद्रावती येथे ७ ते ९ डिसेंबर १९८५ या कालावधीत झालेल्या रणजी करंडक क्रिकेट सामन्यात नामदेव फडते याने गोव्यातर्फे सर्वप्रथम शतकी वेस ओलांडली. डावखुरा सगुण कामत याचे नाबाद त्रिशतकस्वप्नील अस्नोडकरची तीन द्विशतके यासह गोव्याच्या फलंदाजांनी मैदानावर शतकी जल्लोष केला.

कर्नाटकविरुद्धच्या रणजी करंडक सामन्यात नामदेवने पहिल्या डावात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस येत १५६ धावांची नेत्रदीपक खेळी केली. २०१६-१७ मोसमात ओडिशातील कटक येथे सगुणने नाबाद ३०४ धावांची अभूतपूर्व खेळी सजविली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये गोव्याच्या फलंदाजाने नोंदविलेली ही वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या आहे.

प्रेक्षणीय फलंदाजीच्या बळावर स्वप्नील अस्नोडकरने गोव्यातर्फे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक १४ शतके ठोकली आहेत. त्यानंतर सगुणचा क्रम असून त्याने ९ शतके केली आहेत. २०१६-१७ मोसमात कटक येथे सेनादलाविरुद्ध शतक नोंदवून सुमीरन आमोणकरने रणजी पदार्पणात शतक नोंदविणारा गोव्याचा पहिला फलंदाज हा मान मिळविला.

गोव्यातर्फे सर्वाधिक द्विशतके नोंदविणाऱ्या स्वप्नीलने २००५-०६ मोसमात मडगाव येथे त्रिपुराविरुद्ध २०४ धावा२००७-०८ मोसमात रेल्वेविरुद्ध मडगाव येथेच नाबाद २५४ धावातर २०१५-१६ मोसमात जम्मू येथे जम्मू-काश्मीरविरुद्ध २३२ धावा केल्या.

गोव्यातर्फे पाच आणि त्यापेक्षा जास्त शतके

- १४ : स्वप्नील अस्नोडकर

- ९  : सगुण कामत

- ६ : अमोघ देसाई व अमित वर्मा

- ५ : मंदार फडकेस्नेहल कवठणकर व सुमीरन आमोणकर

संपादन- अवित बगळे

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com